काँग्रेस नक्षलवाद्यांचा ‘मित्र’, भाजपच्या गंभीर आरोपाने खळबळ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटना आणि एल्गार परिषद व भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी अटक केलेल्या शहरी नक्षलवाद्यांचे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे. मंगळवारी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या प्रकरणी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. काँग्रेस आणि नक्षलवाद्यांमध्ये मित्रत्वाचे संबंध असल्याचा दावा पात्रा यांनी केला आहे.

मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये संबित पात्रा असा दावा केला की, ‘नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणाने अटक करण्यात आलेल्या शहरी नक्षलवाद्यांच्या तपासामध्ये आणखी एक पत्र हाती लागले असून यात नक्षलवाद्यांनी काँग्रेसमधील आपले मित्र मदतीसाठी तयार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.’विशेष बाब म्हणजे पत्रामध्ये काँग्रेसच्या मित्राचा जो फोन क्रमांक देण्यात आला आहे तो नंबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह याचा असल्याचा आरोप पात्रा यांनी केला. तसेच सत्तेमध्ये असताना काँग्रेसकडून गृहमंत्रिपद भूषवणाऱ्या काहींची नक्षलवाद्यांना सहामुभूती असल्याचा दावा देखील पात्रा यांनी केला आहे. कॉम्रेड सुरेंद्र आणि कॉम्रेड प्रकाश यांचं 25 सप्टेंबर 2017 चे हे पत्र असल्याचे पात्रा यांनी सांगितले.

संबीत पात्रा यांनी यासह काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांचावर देखील गंभीर आरोप केले आहेत. भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या महेश राऊतला यूपीए सरकारच्या काळातही एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. परंतु त्यावेळी जयराम रमेश यांनी पृथ्वीराज चव्हान यांना पत्र पाठवून ‘महेश राऊत हा सज्जन व्यक्ती’ असल्याचे म्हटले होते, असा दावा पात्रा यांनी केला. दरम्यान, पात्रा यांच्या या आरोपांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठा शाब्दिक राडा होण्याची शक्यता आहे.

…तर मला अटक करावी
संबीत पात्रा यांच्या आरोपानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेत याला प्रत्युत्तर दिले. ‘आधी माझ्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला आणि आता नक्षलवादाचा. परंतु यात माझा कोणताही संबंध नाही. माझा नंबर अनेकांजवळ आहे. त्यामुळे सरकारला जर वाटत असेल तर मला अटक करावी’, असे स्पष्टीकरण दिग्विजय सिंह यांनी दिले.