आयकर विभागाच्या कारवाईविरोधात काँग्रेस न्यायालयात जाणार

कर थकबाकी वसुल करण्यासाठी आयकर विभागाने काँग्रेसची खाती गोठवली असून न विचारताच काँग्रेसच्या विविध खात्यांतून 65 कोटी रुपये काढले. याविरोधात काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली असून आयकर विभागाच्या कारकाईविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रकरणी आज शुक्रवारी आयकर अपीलीय लवादासमोर झालेल्या सुनावणीत आयकर विभागाच्या दंडात्मक कारवाईला स्थगिती दिली गेली नाही तर, आगामी निवडणूक लढवणेही अशक्य आहे, असा युक्तिवाद काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर लवादाने याप्रकरणाचा निकाल राखून ठेकला.

काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर तोफ डागली. अशाप्रकारे ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करून काँग्रेसला आर्थिकदृष्टय़ा अपंग बनवण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसने काय बाजू मांडली?
निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला प्रचाराच्या दृष्टीने किमान निधी पुरवावा लागतो. परंतु, काँग्रेसची बँक खाती गोठवली गेली तर पक्षाच्या उमेदवारांचा किमान खर्चही करता येणार नाही. असे झाले तर काँग्रेस किती उमेदवारांना निवडणुकीसाठी उभे करू शकेल याबाबत शंका आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या कारवाईला स्थगिती देण्याची गरज असल्याचा मुद्दा काँग्रेसचे नेते आणि वकील विवेक तन्खा यांनी मांडला.