सभापती भाजपाच्या दबावाखाली काम करताहेत; काँग्रेसच्या महिला खासदारांचे लोकसभा सभापतींना खरमरीत पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची कार्यशैली सध्या वादाच्या भोवऱयात सापडली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलण्यासाठी एकीकडे बिर्ला हे परवानी देत नाहीत. त्याच वेळी लोकसभेत पंतप्रधानांसोबत काही अघटित झाले असते, म्हणून मीच त्यांना लोकसभेत येऊ नका असे कळवले, असे विधान करून ओम बिर्ला चांगलेच अडचणीत सापडले आहेत. काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांना घेराव घालणार होत्या, अशी माहिती पसरविण्यात आली होती. त्याचा जाब विचारणारे एक खरमरीत पत्र काँग्रेसच्या महिला खासदारांनी आज लोकसभा सभापतींना पाठविले.

लोकसभेचे सभापती हे निष्पक्ष असावेत, अशी अपेक्षा असते. मात्र तुमची कार्यशैली बिलकुल या संकेताविरोधात आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांना सभागृहात बोलू दिले जात नाही. विरोधी पक्षनेत्यांना तर जाणीवपूर्वक बोलण्यासापासून रोखले जात आहे, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिले नाही. लोकसभेत पंतप्रधानांसोबत काही अघटित घटना घडण्याची शक्यता होती, तशी माहिती माझ्याकडे होती, असे सभापतींनी सांगितले होते. त्यानंतर काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांना घेरणार होत्या, अशा बातम्या पसरविल्या गेल्या. महिला खासदार म्हणून आमच्यावर असा आरोप करणे चुकीचे आहे. विनाकारण आमच्यावर संशय का व्यक्त केला, असा खरमरीत सवाल या पत्रात विचारण्यात आला आहे.

राहुल गांधींना आजही बोलू दिले गेले नाही

लोकसभेत आजही गदारोळ कायम राहिला. अर्थसंकल्पावरील चर्चेला आज सुरुवात झाली खरी, मात्र चर्चाच झाली नाही. गदारोळामुळे कामकाज दुपारी बारा व त्यानंतर दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी राहुल गांधी यांचे नाव चर्चेसाठी पुकारले. त्या वेळी राहुल यांना तुम्ही केवळ अर्थसंकल्पावरच बोला, इतर विषयांवर तुम्ही बोलू शकणार नाही, असे सांगितले. त्याला राहुल यांच्यासह विरोधी पक्षाच्या इतर खासदारांनी आक्षेप घेतला. त्याच वेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही एक टिप्पणी केली. त्यामुळे सभागृहातला गोंधळ वाढतच गेला. परिणामी संध्या राय यांनी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.