
काँग्रेसच्या काही हौशी कार्यकर्त्यांनी नववर्षानिमित्त लावलेले अभिनंदनाचे अनधिकृत फलक महसूलमंत्री बाळासाहेब थोरोत यांनीच हटविले आहेत. यावेळी त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱयांना बोलावून घेऊन फ्लेक्ससाठी नियमावली बनविण्याच्या सूचना केल्या.
संगमनेरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून भव्य बसस्थानक साकारले आहे. महाराष्ट्रातील देखण्या आणि भव्य बसस्थानकात याची गणना होते. मात्र, या बसस्थानकासमोर हौशी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी केली जाते. त्यामुळे बसस्थानकाचे विद्रुपीकरण होते. महसूलमंत्री बसस्थानकासमोरून जात असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली. शिवाय, तेथे असलेल्या बॅनरवर त्यांचेच फोटो होते. त्यांनी गाडी थांबवून त्यांच्या फोटोचे फ्लेक्स तत्काळ उतरविण्याच्या सूचना सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना केल्या. त्यांच्या या कृतीने काही क्षण त्यांच्या सोबत असणारे कार्यकर्तेही गोंधळले. मात्र, त्यांनी आग्रहाने सांगितल्यावर त्यांचे फ्लेक्स उतरवले गेले.
दरम्यान, तोपर्यंत प्रमुख अधिकारी तेथे पोहोचले. तेथील छोटे मोठे बॅनर तत्काळ हटविण्यात आले. मंत्री थोरात यांनी बॅनर्स लावण्यासाठी नियमावली करण्याच्या सूचना अधिकाऱयांना दिल्या. बसस्थानक व्यवस्थापकांना बोलावून दंडात्मक कारवाई करण्याचेही सुचविले. याशिवाय, बसस्थानकावरील अवैध व बेशिस्त पार्ंकगला आळा घालण्यासाठीही ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले.
































































