वारंवार फोन करून बायकोला त्रास देणाऱ्याचा पतीकडून खून

2548
murder

अलिबाग तालुक्यातील कर्जत येथे दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्‍या खुनाच्‍या गुन्‍ह्यातील आरोपीच्‍या रायगड पोलिसांनी पुराव्‍याच्‍या आधारे मुसक्‍या आवळल्‍या आहेत. ताज आलम उमर अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. पत्‍नीला वारंवार फोन करून त्रास दिल्‍याच्‍या रागातून आरोपी ताज आलम उमर अन्सारीने हे कृत्‍य केल्‍याचे समोर आले आहे.

18 नोव्‍हेंबर रोजी संध्‍याकाळी कर्जत येथील शनी मंदिरापासून दर्ग्‍याकडे जाणाऱ्या रस्‍त्‍याच्‍या बाजूला रेल्वे हद्दीतील गोदामाच्‍या मागे एक मृतदेह सापडला होता. हा खून होता हे पोलीस तपासात निष्पन्न झाले, परंतु मृत स्‍थानिक नसल्‍याने त्‍यांची ओळख पटत नव्‍हती. त्‍यामुळे तपासात अडथळे येत होते. लागलीच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि पोलीस पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. यात मृत व्‍यक्‍तिचे नाव झहीरुद्दिन बशीर बक्ष असून तो मध्यप्रदेशातील खरवा येथील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने मृताच्‍या नातेवाईकांशी संपर्क करून, त्यांच्‍याकडून घटनेच्या अनुषंगाने माहिती मिळवली. त्याचप्रमाणे तांत्रिक पुरावे गोळा केले. तांत्रिक पुरावे आणि मिळालेल्या माहितीची वस्तुनिष्ठ सांगड घालून ताज आलम उमर अन्सारी, (रा. मोहोपाडा, ता.खालापूर मूळ रा. मध्यप्रदेश) हा संशयित असल्‍याचे निष्पन्न झाले. त्‍याला लागलीच ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबूली दिली.

झहीरुद्दीन आणि अन्सारी हे दोघेही एकाच गावातील रहिवासी आहेत. झहीरुद्दीन हा वेगवेगळ्या मोबाईल नंबरने आरोपीच्‍या पत्नीस फोन करून नेहमी त्रास देत असे. ही बाब आरोपीच्या पत्नीने आरोपीच्‍या कानावर घातली. त्‍यानंतर त्‍याचा काटा काढण्‍याचा निर्णय अन्‍सारीने घेतला. त्‍यानुसार अन्सारी याने झहीरुद्दीन याला नाशिक येथून कर्जत येथे बोलावून घेतले. तिथे तो आल्यानंतर रेल्वे प्लॅटफॉर्मच्या पुढे रुळांलगत घेऊन जाऊन दगडाने ठेचून ठार मारल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा छडा लावण्याची कामगिरी पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि पथकाने पार पाडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या