
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्वप्रथम जिल्हास्तरावर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करुनही सरकारकडून कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. आज जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करत सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर काम बंद आंदोलन छेडले. राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत कंत्राटी नर्सेस शहरी ग्रामीण एएनएन, जीएनएम, एमएचव्ही, एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्र-1, औषधनिर्माण अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, एनयूएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी काम बंद आंदोलन छेडण्यात आले.
मागील पंधरा वर्षांपासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर खेडोपाडी व शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्र-1, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकिय अधिकारी इत्यादी संवर्गात कंत्राटी कर्मचारी सेवा बजावत आहेत. कोविडच्या काळातही या कर्मचाऱ्यांनी देवदूतासारखे कार्य केले आहे. 20 मार्च 2023 रोजी आरोग्यमंत्र्यांच्या कक्षात एक बैठक झाली. त्या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी नर्स, शहरी व ग्रामीण भागातील एएनएम जीएनएम, एमएचव्ही. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व एनयूएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजन करण्याकरीता लवकरच कार्यवाही करण्यात येईल. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर अनेक महिने होऊनही समायोजनाची कार्यवाही तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत कार्यवाही न झाल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे.



























































