भाजप मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱया कंत्राटदाराची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील भाजप सरकारच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱया कंत्राटदाराने मंगळवारी आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. संतोष पाटील असे कंत्राटदाराचे नाव असून उडुपीतील लॉजमध्ये त्याचा मृतदेह आढळला. त्याने भाजपचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्यामुळे आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे ईश्वरप्पा चौकशीच्या कचाटय़ात सापडले आहेत.

संतोष पाटील हा भाजपचा कार्यकर्ता होता. तसेच तो हिंदू वाहिनीचा राष्ट्रीय सचिव म्हणूनही सक्रिय होता. त्याने भाजपच्या सरकारमधील ग्रामीण विकास आणि पंचायत राज्यमंत्री ईश्वरप्पा यांच्यावर लाचेचा गंभीर आरोप केला होता. ईश्वरप्पा यांनी रस्त्याच्या कामांची बिले काढण्यासाठी आपल्याकडे 4 कोटी रुपयांची लाच मागितली, असा सनसनाटी आरोप संतोष पाटीलने केला होता. त्याला काही दिवस उलटत नाही तोच संतोष एका लॉजमध्ये मृतावस्थेत आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. संतोषने मृत्यूपूर्वी मित्रांना व्हॉट्सऍप मेसेज केले होते. त्यात त्याने ईश्वरप्पा यांनाच जबाबदार धरले आहे. ईश्वरप्पा यांच्यामुळेच मी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे संतोषने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. त्याआधारे पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. संतोषने काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून राज्यातील भ्रष्ट कारभाराकडे लक्ष वेधले होते.

ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी

ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतरच संतोष पाटील मृतावस्थेत आढळल्याने राजकीय वाताकरणही तापले आहे. काँग्रेसने ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याचवेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेची कसून चौकशी केली जाईल आणि यात सरकार हस्तक्षेप करणार नाही, असे सांगितले.