कंत्राटदारांवर आता वर्षभर खड्डे, रस्त्यांच्या डागडुजीची जबाबदारी

मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट- काँक्रीटीकरण करण्यासाठी पालिकेला कंत्राटदार मिळत नसल्यामुळे खड्डे भरणे आणि रस्त्यांच्या डागडुजीचे काम केले जाणार आहे. यामध्ये वांद्रे ते गोरेगावपर्यंतच्या कामासाठी 49.50 कोटींचा खर्च केला जाणार असून पावसाळय़ापूर्वी, पावसाळय़ात आणि पावसाळय़ानंतर रस्ते आणि खडे भरण्याचे काम केले जाणार आहे. मास्टिक अस्फाल्टने हे काम केले जाणार असून यासाठी पालिकेने आज निविदा मागवल्या आहेत.

मुंबईतील रस्ते सिमेंट -काँक्रीटचे करण्यासाठी सहा हजार कोटींचे टेंडर देण्यात आले आहे, मात्र मुंबईत 397 किमी अंतरातील 910 रस्त्यांच्या कामांपैकी आतापर्यंत 123 कामे सुरू झाली आहेत. उर्वरित 787 कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. यातील फक्त 11 कामे पूर्ण झाली असून 4 प्रगतिपथावर आहेत. यातच पावसाळा सुरू होण्यास अवघे काही महिने शिल्लक राहिले असल्यामुळे पालिका पावसाळापूर्व कामे वेगाने करीत आहे. यामध्ये सर्वाधिक टीका होणारे खड्डे बुजवण्यासाठी काम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये पश्चिम उपनगरांतील झोन-3 मधील एच पूर्व, एच पश्चिम वांद्रे आणि के पूर्व अंधेरी वॉर्डामध्ये म्हणजे वांद्रे ते मालाड- गोरेगावपर्यंतच्या रस्त्यांवरील खड्डे, बॅडपॅच भरण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत.