वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात ट्रॅक्टरवर मजुरी काम करण्यासाठी म्हणून यवतमाळ जिल्ह्यातून हिंगणघाट शहरात आलेल्या मजुरांमध्ये मटण खाण्यातून झालेल्या वादात , तिघांनी मिळून एका मजुराची हत्या करण्याचा प्रकार हिंगणघाट शहरात घडलेला आहे.
हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वार्ड मध्ये असलेल्या नॅनो पार्क मध्ये काल रात्री ही घटना घडली असून, यातील तीनही आरोपीस हिंगणघाट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तुकाराम नामदेव कासारे असं मृतकाचं नाव आहे.
पांडुरंग बापूनजी परसोडे, विजय दावलू मदनकर, दिलीप अनंतराव दांडेकर हे आरोपी आहेत. ट्रॅक्टरवर काम केल्यानंतर आठवड्याच्या पगार मिळाल्याने या आरोपींनी मटणाचे जेवण तयार केले होते. 13 मे च्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास मृतक तुकाराम कासारे हा आरोपी जवळ आला या दरम्यान मटणाच्या जेवणाचा विषय घेऊन या चौघांत वाद झाला. यातील तीनही आरोपींनी तुकाराम कासारे याच्या डोक्यावर जबर मार केल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.
शेजारी राहणाऱ्या एका इसमानं 112 नंबरवर फोन करून माहिती दिली. हिंगणघाट पोलिसांचे प्रमुख घटनास्थळी दाखल झाले. याबाबत लगेच हिंगणघाट पोलिसांनी यातील तीनही आरोपींना ताब्यात घेतलं असून यापूर्ण प्रकरणाचा तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत.