
उत्तर प्रदेशातील धर्मांतरप्रकरणी रविवारी रात्री उत्तर प्रदेश एटीएसने नाशिकमधून कुणाल चौधरी ऊर्फ आतिफ याला अटक केली आहे. धर्मांतरासाठी त्याच्या खात्यावर विदेशातून वीस कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या कारवाईबाबत नाशिक पोलिसांना कुठलीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
उत्तर प्रदेश एटीएसने मुजफ्फरनगरमधून मोहम्मद इदरीस कुरेशी, मोहम्मद सलीम मोजुद्दीन यांना अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून मुंबई एटीएसच्या मदतीने नाशिकरोड भागातील आनंदनगर येथील रहिवाशी कुणाल अशोक चौधरी ऊर्फ आतिफ याला रविवारी रात्री उशीरा अटक केली. पहाटेपर्यंत त्याची नाशिकमध्येच चौकशी सुरू होती, असे समजते. आतिफ हा रशियातून उच्च शिक्षण घेवून आला असून, तेथेच त्याचे धर्मांतर झाले आहे. त्याच्या परिवारात अन्य कुणाचेही धर्मांतर झालेले नाही. उत्तर प्रदेशातील आपल्या साथीदारांच्या मदतीने तो राज्यात धर्मांतराचे रॅकेट चालवित होता, असा संशय आहे. नाशिकमध्ये त्याने मूकबधिर मुलांच्या नातेवाईकांशी जवळीक वाढविली होती, असेही सांगितले जाते.

































































