शांत आणि धूर्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अजित वाडेकरला जाऊन आता सोळा-सतरा तास होऊन  गेले, पण जखम भळभळतच आहे. कधी तरी त्यावर खपली धरेल. पण त्या जखमेतून वाहणाऱया आठवणी थांबण्याचं आणि डोळय़ांत जमा होणाऱया अश्रूंना कोरडं करणारं घट्ट मन माझ्याकडे नाही.

कुठून सुरुवात करावी?

पण मीच, मला, अर्ध्या चड्डीतला, शिवाजी पार्कच्या गर्दीतून अजित वाडेकरची फलंदाजी डोळय़ांच्या पापण्यात गुंडाळून घरी घेऊन जाताना दिसतोय. कांगा लीग वेळच्या ओल्या गवतातही त्याची स्क्वेअर कट सीमापार जायची. आळसाला सौंदर्य असतं हे त्या काळात अजित वाडेकरला पाहून कळलं. मी रिची बेनॉ किंवा फ्रॅन्क वॉरेलची मैदानावरची चाल पाहिली नाही. ती अफलातून होती असं जाणकार सांगतात. पण त्याबाबतीत मनावर ठसलेले तीन खेळाडू म्हणजे सोबर्स, रिचर्डस, अजित वाडेकर! सोबर्सच्या बाबतीत त्याची ती उंच कॉलर, पुढे आलेली छाती, किंचित मागे सरकलेला पार्श्वभाग आणि देवेंद्राची पावलं अजून डोळय़ांसमोर आहेत. चुईंगम चघळत प्रतिस्पर्ध्याला कस्पटासमान मानत खेळपट्टीवर जाणारा विव्ह रिचर्डस् नेहमीच भावला. अजितची चाल वेगळीच होती. सावकाश, थंडपणे, डुलत डुलत, पण तरीही डौलदार! दोन वर्षांपूर्वी त्याच्या वयाच्या पंचाहत्तरीत दादर युनियन-शिवाजी पार्कच्या एका वयस्करांच्या मॅचच्या वेळी आम्ही अजितला सांगितलं, ‘‘फक्त विकेटपर्यंत चालत जा.’’ तो चालत गेला. आम्ही थेट भूतकाळात कधी गेलो कळलंच नाही. स्लिपमध्ये उभं राहिल्यावर इतरांच्या नंतर तो वाकायचा, पण त्याच्या हालचाली इतक्या वेगवान आणि सौंदर्यशाली असत की, झेलही त्याच्या पंजाच्या प्रेमात पडत. म्हणूनच मी म्हटलं, आळसाला त्याने सौंदर्य बहाल केलं. आजचे आपले स्लिपचे क्षेत्ररक्षक वाडेकरने घेतलेले झेल स्वप्नातही पकडू शकत नाहीत.

त्याचा युनिव्हर्सिटीचा परफॉर्मन्स मी इतरांकडून ऐकला. पाहिला नाही, पण त्याच्या पराक्रमाला त्यानंतर कुणी स्पर्श केला नाही.
त्याच्या रणजी-दुलीपच्या कामगिरीबद्दल वासू परांजपे म्हणतो की, ‘‘तसा पराक्रम सुनील-सचिनलाही जमला नाही.’’ ते मला पटतं. वाडेकर हे तिथे धावांच्या नायगाराचं नाव होतं. अजूनही डोळय़ांसमोर आहेत. त्या अजितच्या म्हैसूरविरुद्धच्या 323 धावा! चंद्रा-प्रसन्नासमोर! आणि तो पॅव्हेलियनमध्ये सटकणारा प्रसन्ना!
त्याला कसोटीत संधी दिली तेव्हा कितीतरी युगं आधी त्याला संधी द्यायला हवी होती असं आम्हाला वाटलं होतं. 1964 ते 73 च्या काळात वाडेकर फलंदाजी करतोय म्हटल्यावर ब्रेबॉर्न स्टेडियम काठोकाठ भरायचा. कसोटीत त्याला आमच्या अपेक्षेएवढं यश मिळालं नाही. त्या यशासाठी मी रेखा वहिनीपेक्षा देवाला नवस जास्त केले होते. त्याच्या धावा होत नसत, त्यावेळी धड जेवण जायचं नाही. फार फार वेडा आणि भावुक होतो मी. पण तो मॅचविनर होता. त्याच्या आयुष्यात हिंदुस्थानने जिंकलेल्या नऊ कसोटींत त्याचा सहभाग होता. त्यातल्या सहामध्ये त्याने संघाचा धावांचा मोठा भार वाहिलाय. 1969 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीला भिंगरी खेळपट्टीवर पाठलाग करताना नाबाद 91 धावा करून त्याने जिंकून दिले. त्यावेळी आजच्या एवढे कौतुक होत नव्हते. त्या दिवशी संध्याकाळी मी आनंदात पूर्ण ग्लास पियुष प्यायलेलं मला आठवतंय. त्यावेळी बीयरची चव चाखलेली नव्हती आणि शॅम्पेन तर स्वप्नातही आली नव्हती.

मला विचारलं जातं, ‘‘अजित कसा कर्णधार होता? कसा फलंदाज होता?’’
डोक्याने शांत, धूर्त, पण लोकशाहीवादी. इतरांशी सल्लामसलत करून मग स्वतःचा निर्णय घेणारा. अपेक्षित हुकूमशाही वृत्ती नसल्याने त्याला ‘लकी’ ठरवलं गेलं. डोक्यावर बर्फ ठेवण्याच्या बाबतीत धोनी हा अजित वाडेकरचा वारसदार आहे. मी अजितला मैदानावर, मैदानाबाहेर चिडलेलं पाहिलेलं नाही. 1971 साली त्याने सलीम दुराणीच्या हातात चेंडू दिला. सलीमने मागितला, त्याने दिला. सलीम मला सांगत होता की, त्याने अजितला सांगितले, ‘‘स्लिपमध्ये जा.’’ अजित म्हणाला, ‘‘नको, मी मिडविकेटवर ठीक आहे.’’ दुसऱया क्षणी लॉईडचा झेल मिडविकेटवर अजितच्या पोटात आला. सलीमने सोबर्स-लॉईड काढून दिल्यावर अजितने थेट चेंडू वेंकटकडे फेकला. त्याने मॅच फिरवली. हा काय फक्त नशिबाचा भाग? हं, अजितला मैदानावर कर्णधार म्हणून ‘चमकणं’ जमलं नाही.

महान डावखुऱया फलंदाजीचं वेगवेगळं सौंदर्य आहे. नर्तकीचं पदलालित्य असणारा हार्वे वेगळा आणि सोबर्स वेगळा. गावर, दुराणी, लारा यांची आणखीन वेगळी शैली. अजितपेक्षा कसोटी सरासरी गौतम गंभीरचीही जास्त असेल. पण गुणवत्ता, फलंदाजीतलं सौंदर्य याबद्दल एवढंच सांगेन, पूर्ण भरातला अजित वाडेकर पाहताना जर मधुबाला मला भेटायला आली असती, तर मी तिला सांगितलं असतं, ‘‘त्या खुर्चीवर बस. आधी याच्या फलंदाजीचं सौंदर्य डोळय़ांनी घटाघटा पितो. मग तुझं!’’ ज्या फलंदाजाची बॅकलिफ्ट मोठी, फॉलोथ्रू मोठा, तो सुंदरच वाटतो. सलीम, लारा यांची त्या जातीची फलंदाजी. अजितची बॅकलिफ्ट लहान, फॉलोथ्रू कमी. तरीही त्याच्या फलंदाजीला एक वेगळं अंगभूत सौंदर्य होतं. तो बचाव करतोय असं वाटणारा फटका, व्हॉटस् ऍप मेसेजपेक्षा वेगात सीमापार जायचा. पुल, कट, हूक, ग्लान्स, स्वीप, ड्राइव्हज् अगदी सर्वच फटके, मागच्या जन्मी शिकल्यासारखे तो खेळत असे. त्याच्या बॅटने कुठलाही फटका कधी ऑप्शनला टाकला नाही. त्याच्याशी शेकहॅण्ड करताना त्याचं मनगट पाहिलं की, फटक्यातली ताकद कुठून येते ते कळायचं. रोहित शर्माने त्याच्याकडून उसनं घेतलंय असं वाटावं असं अजितचं टायमिंग होतं. कुठल्याही वेगवान गोलंदाजासमोर तो लीलया उभा राहिला. खेळपट्टी हिरवी असो किंवा बाऊन्सी, त्याने आपला तिसरा क्रमांक सोडला नाही. नाइट वॉचमन पाठवायच्या ऐवजी तो स्वतः यायचा. तलत मेहमूदच्या आवाजाचं वर्णन करताना मुलायम, मखमली, मलमली किंवा सिल्कसारखा वगैरे विशेषणं आपण वापरतो. वाडेकरच्या फटक्याला मी हीच विशेषणं लावेन.एकेकाळचा हा माझा ‘देव’, माणूस बनून माझा जवळचा मित्र झाला. आम्ही अरेतुरेवर आलो. तो हिंदुस्थानी संघाचा प्रशिक्षक झाला. देशपरदेशातल्या सामन्यांच्या वेळी त्याची खोली ही आमची खोली होती. कुठलीही भंकस करण्याएवढे आम्ही मित्र झालो. उदाहरण देतो. एकदा श्रीलंकेत तो मला म्हणाला, ‘‘अरे पपू, तुझी इथली मुलं भेटली होती. तू त्यांना शाळेचा युनिफॉर्म शिवून दिला नाही म्हणत होती.’’ मी त्याला म्हटले, ‘‘मलाही तुझी मुलं भेटली. त्यांच्या कॉलेजच्या फीसाठी ती तुझी वाट पाहतायत.’’ त्याच्याबरोबर दौऱयावर असताना मला जाणवलं की, हा का यशस्वी कर्णधार झाला. त्याचं मॅन मॅनेजमेंट उत्तम होतं. कधी विनोदाने, कधी ‘लेकी बोले सुने लागे’ पद्धतीने तो कान उपटायचा. पण खेळाडू त्याच्यावर पेम करायचे. म्हणून सुनील, एकी, अझरला तो मोठा भाऊ वाटायचा. सचिन-विनोदला तर त्याने मुलासारखं जपलं.

अजित वाडेकर माझ्यासाठी कुटुंबाचा भाग होता. माझ्या जवळपास प्रत्येक पुस्तकाच्या प्रकाशनाला अजित वाडेकर असायचा. माझ्या स्वरा आर्टस्च्या संगीत कार्यक्रमांना रेखा आणि अजितच्या पहिल्या ओळीतल्या खुर्च्या ‘रिझर्व्ह’ असायच्या. आता जेव्हा जेव्हा मी स्टेजवर उभा राहीन तेव्हा ती खुर्ची मला खायला उठेल. ही दुःखाची जखम एक डाग होऊन भरते, पण तिच्याकडे पाहिल्यावर कुठल्याही बांधाला न जुमानणाऱया आठवणी उसळून येतील. माझ्यासाठी या आठवणी हाच अजितचा पुनर्जन्म आहे.