
दिल्लीतील हजरत निझामुद्दीन स्थानकात नुकताच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका कुलीने वृद्ध एनआरआय प्रवाशाची व्हिलचेअर ढकलण्यासाठी आणि ‘लगेज’साठी 10 हजार रुपये घेतले. या घटनेची तक्रार आल्यानंतर रेल्वेने तत्काळ कारवाई करत संबंधित कुलीचा परवाना रद्द केला. कुलीचा बॅज ताब्यात घेतला आणि त्याच्याकडील 90 टक्के रक्कम घेऊन प्रवाशाला परत दिली.
या प्रकरणी मूळची गुजरात येथील आणि सध्या लंडन येथे राहणाऱ्या पायल नावाच्या महिलेने तक्रार केली. 21 डिसेंबर रोजी ती लंडन येथून कुटुंबासह दिल्लीला आली. पायलच्या आई-वडिलांना 28 डिसेंबर रोजी आग्रा येथे जायचे होते. हजरत निझामुद्दीन स्थानकात एका कुलीने त्यांना गाठले. त्यांची व्हिलचेअर ढकलण्यासाठी आणि सामान प्लॅटफॉर्मवर पोहोचवण्यासाठी 10 हजार रुपये शुल्क आकारले. धास्तावलेल्या वृद्ध जोडप्याने मुलगी पायलला कळवले. पायलने तत्काळ आग्रा येथे रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेज तपासून हा लुटीचा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर पोलिसांनी कुलीवर कारवाई केली.