
राज्यात कागदावर चालणाऱ्या सहकारी संस्थांना आता टाळे लागणार आहे. सहकार विभागाकडे सध्या 1 लाख 98 हजार नोंदणीकृत सहकार संस्था आहेत. मात्र त्यापैकी अनेक संस्था प्रत्यक्ष कामकाज करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच काही संस्था फक्त कागदोपत्री अस्तित्वात आहेत. त्यामुळे त्यांचे ना दैनंदिन कामकाज होते, ना लेखापरीक्षण. त्यामुळे अशा संस्थांचा शोध घेऊन त्या कायदेशीरपणे बंद करण्यासाठी सहकार विभागाने 15 ऑगस्टपासून पुढे महिनाभर राज्यभरातील संस्थांचा ठावठिकाणा घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कागदावर संस्था चालवणाऱयांचे धाबे दणाणले आहे.
एखाद्या सहकारी संस्थेची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम 1961 नुसार व उपविधीतील तरतुदीप्रमाणे दैनंदिन कामकाज होणे बंधनकारक आहे; परंतु अनेक संस्था स्थापन केलेल्या उद्देशाप्रमाणे प्रत्यक्ष आपले कामकाज करत नसल्याचे समोर आले आहे. दैनंदिन कामकाजाचे रेकॉर्ड तयार करत नाहीत, लेखापरीक्षण अहवाल सहकार विभागाला सादर करत नाहीत. तसेच कित्येक संस्था नोंदणीकृत पत्त्यावरही नाहीत. यावरून त्यांनी कामकाज थांबवल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर केवळ कागदोपत्री असलेल्या संस्थांची नोंदणी रद्द करून अस्तित्वात असलेल्या संस्थांच्या निकोप वाढीला चालना देण्याचे धोरण सहकार विभागाने अवलंबले आहे. त्यासाठी बंद असलेल्या संस्थांचा शोध घेण्यासाठी महिनाभार सहकार विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचे निर्देश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिले आहेत.
अशी होणार संस्थेची नोंदणी रद्द
सहकार विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सदरची संस्था नोंदणीकृत पत्त्यावर नसल्यास, दैनंदिन कामकाज करत नसल्यास किंवा बंद असलेल्या संस्था संबंधित जिल्हा उपनिबंधक अवसायानात घेऊन नोदणी रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्याआधी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून संस्थेवर कारवाई केली जाणार असून त्याबाबत त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
























































