
सामना प्रतिनिधी । पुणे
पुणे पोलिसांनी पाच ‘शहरी नक्षलवाद्यांना’ अटक केल्यानंतर त्यातून धक्कादायक खुलासे झाले आहेत. पुणे पोलिसांनी रोना विल्सन याच्या जप्त केलेल्या लॅपटॉपमधून फरार माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याने विल्सनला लिहिलेले पत्र सापडले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून कॉम्रेड प्रकाश आंबेडकर, काँग्रेसमधील काही मित्रही मदत करणार आहेत, याचा फायदा ‘सीपीआय मोओवादी’ संघटनेला होणार आहे, असा स्पष्ट उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रक्षोभक भाषण करून जमावाला चिथवल्याप्रकरणी आमदार जिग्नेश मेवाणी, उमर खालीद यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. मात्र अद्यार कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर २ जानेवारी रोजी हे पत्र लिहिले गेले आहे. बुधवारी पुणे पोलिसांनी मुंबई, नागपूर, दिल्लीतून सुधीर ढवळे, अॅड. सुरेंद्र गडलिंग, सोमा सेन, महेश राऊत आणि रोना विल्सन यांना अटक केली. यासंदर्भात सहआयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पोलीस उपायुक्त संजीवकुमार बावीस्कर, डॉ. प्रवीण मुंढे, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यावेळी उपस्थित होते. केंद्र शासनाने ‘सीपीआय माओवादी’ संघटना ही प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे. तिच्यावर बेकायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई कायद्यानुसार (यूएपीए) बंदी घातली आहे. या संघटनेशी ढवळे, अॅड. गडलिंग, रोना, सेन आणि राऊत या शहरी माओवाद्यांचा संबंध असल्याचे अधिकृत कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही ‘यूएपीए’ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. झारखंड, छत्तीसगढ, बिहार या भागांत माओवाद्यांनी केलेल्या हिंसाचारातही त्यांचा अप्रत्यक्षरीत्या संबंध असण्याची शक्यता आहे. याच्या लिंक पोलिसांनी जप्त केलेल्या कागदपत्रांतून स्पष्ट होत आहेत.
एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. हा निधी अॅड. गडलिंग आणि रोना विल्सन या दोघांच्या माध्यमातून सुधीर ढवळे यांना देण्यात आला होता. एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांकडून पैसा आल्याचे भक्कम पुरावेही सापडले आहेत. हा पैसा कोणाकडून आला, किती आला, याचा तपास सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले. दरम्यान, भीमा कोरेगाव दंगलीसंदर्भात ग्रामीण पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत मला काहीही माहिती नाही, असेही कदम यांनी सांगितले.
फरार मोओवाद्यांच्या मदतीने ‘एल्गार’चे आयोजन
एल्गार परिषदेच्या दोन महिने आधीपासून सुधीर ढवळे हे फरार नक्षलवादी दीपू आणि मंगलू या दोघांच्या संपर्कात होते. त्यांनी चर्चा करून एल्गार परिषदेचे नियोजन कशाप्रकारे करायचे, हे त्यांनी ठरविले होते. तसेच, यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता.
भीमा कोरेगाव दंगलीचा संबंध नाही
एल्गार परिषदेनंतर झालेल्या भीमा कोरेगाव दंगलीमध्ये अटक केलेल्या शहरी माओवाद्यांचा सहभाग असल्याचे पुरावे अद्यापि मिळालेले नसल्याने सध्या तरी याच्याशी त्यांचा संबंध नाही. पुढील तपासामध्ये त्याबाबत पुरावे मिळाल्यास त्यानुसार कारवाई केली जाईल, असे रवींद्र कदम यांनी सांगितले.
मेवाणी, खालीदवर अद्याप कारवाई नाही
प्रक्षोभक भाषण करून जमावाला चिथवल्याप्रकरणी आमदार जिग्नेश मेवाणी, उमर खालीद यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. यामध्ये अद्यापि कोणालाही चौकशीसाठी बोलावले जाणार नाही. पुढील तपासात गरज पडल्यास चौकशीसाठी बोलावले जाईल, असे कदम यांनी सांगितले.





























































