
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चारही दरवाजे अचानक बंद करून पोलिसांनी श्वानपथकाद्वारे शोधमोहीम राबविली. यावेळी भाविकांना बाहेर काढण्यात आले. निनावी पह्नमुळे काहीतरी अघटित होण्याच्या शक्यतेने पोलिसांकडून सुरू असलेल्या या तपासणीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, पोलिसांकडून ही मॉकड्रिल करण्यात आल्याचे समजताच भाविकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी दहशतवादी घटना वा काही गंभीर प्रसंग उद्भवला तर पोलीस यंत्रणा किती सज्ज आहे, हे पाहण्यासाठी अशा ठिकाणी पोलिसांकडून अचानक मॉकड्रिल करण्यात येते. काल 26/11 हल्ल्याच्या स्मृतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल अलर्ट ठेवण्यात आले होते. तर, आज यासंदर्भात येथील श्री अंबाबाई मंदिरातच पोलिसांकडून मॉकड्रिल करण्यात आले. आज सायंकाळी पाचच्या सुमारास सुट्टीच्या दिवसांमुळे नेहमीप्रमाणे मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी अचानक दाखल झालेल्या पोलिसांच्या विशेष पथकाने मंदिरातून भाविकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही कळण्यापूर्वीच पोलिसांकडून मंदिराचे चारही दरवाजे बंद करून भाविकांना गेटबाहेर काढण्यात आले.
एका निनावी धमकीच्या फोनमुळे ही कारवाई सुरू असल्याची माहिती समजताच भाविकांमधूनही तर्कवितर्कांना उधाण आले होते. यात भाविकांची चांगलीच धावपळ उडून घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुमारे अर्धा ते पाऊण तास मंदिरात तपासणी सुरू होती. अखेरीस पोलिसांकडून ‘मॉकड्रिल’ सुरू असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
























































