
सामना ऑनलाईन, पिंपरी
गृहनिर्माण संस्थांच्या सर्वसाधारण सभेमध्ये आता पोलीसही येऊन बसणार आहेत. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एक नवा प्रयोग पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के पद्मनाभन यांनी राबवण्याचं ठरवलं आहे. या सभांना हजेरी लावल्यास अनेक अनुचित गोष्टी घडण्यापूर्वीच पोलिसांना कळतील असा अंदाज आहे. एकदा का समस्या कळाल्या की त्यांच्या गांभीर्यानुसार त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत
अनेक गृहनिर्माण संस्थांच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ होतात, प्रकरण हाणामारीपर्यंत जातं. हे वाद कमी व्हावेत हा पोलिसांचा महत्वाचा उद्देश आहे. पोलीस बैठकीला हजर असल्याने बोलण्यास कचरणाऱ्या मंडळींना धीर येईल आणि ते देखील समस्या मांडू शकतील असंही पोलीस आयुक्तांना वाटतंय. सोसायट्यांच्या बैठकांमध्ये काही मुद्दे असे असतात जे गुन्ह्यांना आमंत्रण देणारे असतात किंवा गुन्ह्याचा/गुन्हेगारांकडून होणाऱ्या त्रासाबद्दलचे असतात. हे मुद्दे कळाल्यास गुन्ह्यांना लवकर आळा घालता येऊ शकेल असं पोलिसांना वाटतंय.
कोणत्या मुद्दांवर असेल पोलिसांचे लक्ष?
- सदस्याकडून होणारा महिलांचा लैंगिक छळ , कौटुंबिक कहलाच्या तक्रारी
- सोसायटी शेजारी असलेल्या बार,पब, हॉटेलमुळे होणारा त्रास
- फटाके फोडणे, उगाच हॉर्न वाजवणे, बाईकची रेसिंग लावणे
- गैरमार्गाने फ्लॅट भाड्याने देणे
- अतिक्रमण, घुसखोरी
- सोसायटीमध्ये चालणारे अवैध धंदे
- पोलीस पडताळणीशिवाय सुरक्षारक्षक नेमणे
वरील मुद्दे असे आहेत, ज्यांच्याबाबत तक्रारी केल्या जाऊ शकतात. या तक्रारी कळाल्यानंतर पोलिसांना तत्काळ कारवाई करणं शक्य होईल. पोलिसांच्या या निर्णयाचं गृहनिर्माण संस्थांनी स्वागत केलं असून , पोलिसांच्या उपस्थितीमुळे गुन्ह्याशी निगडीत मुद्दे उपस्थित करण्यासाठी बरेच घरमालक पुढे येतील असा विश्वास या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


























































