दोन दिवसांत कोरोनाचे 11 हजार सक्रियरुग्ण घटले, दिवसभरात 3,611 रुग्ण, 36 जण दगावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात गेल्या दोन दिवसांत 11 हजारांहून जास्त सक्रिय रुग्णांची संख्या घटल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सक्रिय रुग्णांच्या संख्येत 8 हजारांनी तर आज 3 हजारांनी घट झाली. गुरुवारी 36 हजारांवर 244 वर असलेली रुग्णसंख्या आज 3 हजारांनी कमी होऊन ती 33 हजार 232 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात 3 हजार 611 रुग्ण सापडले तर 36 जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये सर्वाधिक 9 रुग्णांचा मृत्यू झाला.

देशात एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ एप्रिल महिन्याच्या अखेरीपासून कमी होत असून मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. देशात आठवडाभरात दरदिवशी सरासरी 4 हजारांच्या आत कोरोना रुग्ण सापडत आहेत. एप्रिल महिन्यात दरदिवशी सरासरी 9 ते 10 हजारांच्या आसपास सापडत होते. मात्र, आठवडाभरापासून यात विक्रमी घसरण झाली आहे.

राज्यात दोघांचा मृत्यू

मुंबईसह राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. राज्यात आज 299 रुग्ण सापडले तर दोघा जणांचा मृत्यू झाला. 1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत राज्यात 104 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 583 जण कोरोनामुक्त झाले तर 11 हजार 155 चाचण्या करण्यात आल्या. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 475 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आज 87 रुग्ण सापडले तर 135 जण कोरोनामुक्त झाले. 1 हजार 519 चाचण्या करण्यात आल्या तर सक्रिय रुग्णांची संख्या 581 वर पोहोचली आहे.