
गणेशोत्सव म्हणजेच आनंदोत्सव. पण यावेळी या उत्सवावर कोरोनाचं सावट पसरलं. अशाही स्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील गणेशभक्तांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झालेला नाही. घरगुती गणेशाची स्थापना यावेळीही मोठ्या उत्साहात केली जात आहे.
चंद्रपुरात सकाळी नऊ वाजल्यापासून भाविकांनी मूर्ती बाजारात गर्दी करायला सुरुवात केली. यावेळी मोठ्या मंडळांना शासनाने कठोर निर्बंध घातल्यानं मोठ्या मूर्ती तयार होऊ शकल्या नाही. मात्र, घरगुती मूर्तींची पेठ चांगली फुललेली दिसून आली. मातीच्या मूर्तींची मागणी दिवसेंदिवस वाढत चालल्यानं याच मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आल्या. मूर्ती यावेळी थोड्या महाग असल्या, तरी मूर्तिकारांची अडचण लक्षात घेऊन भाविकही ते सहन करीत आहेत. यावर्षी केवळ छोट्या मूर्तींवरच निभावावे लागत असल्याने मूर्तिकारांना थोडा आर्थिक फटकाही बसला आहे.
गणेशोत्सव हा आनंदाचा आणि आस्थेचा उत्सव असल्यानं भाविकांच्या उत्साहावर तसूभरही फरक पडलेला नाही. उलट विघ्नहर्ता कोरोनाचं हे संकट दूर करेल आणि पुन्हा एकदा आपण सुखी-संपन्न होऊ, हीच मनोकामना बाळगून गणेशभक्त आज बाप्पाची स्थापना करीत आहेत.
पाहा व्हिडीओ-


























































