
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून गेल्या काही दिवसांत देशभरात दुसरी लाट वेगाने खाली आली आहे. दुसऱया लाटेतील ‘पिक पीरियड’ च्या तुलनेत नवीन रुग्णवाढीच्या प्रमाणात 85 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी देण्यात आली.
कोरोना रुग्णवाढीत 85 टक्क्यांनी झालेली घट हे कोरोनाचे संक्रमण वेगाने कमी होत असल्याचे निदर्शक असल्याचे आरोग्य खात्याचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. देशात सध्या 9 लाख 13 हजार 378 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 10 मे रोजी हीच संख्या 37 लाख 45 हजार 237 इतकी होती. थोडक्यात, सक्रिय रुग्णांच्या बाबतीत गेल्या महिनाभरात मोठी घट नोंदवली असल्याचे ते म्हणाले.
26 कोटी लोकांचे लसीकरण
कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण हे एक मोठे शस्त्र आहे. देशात आतापर्यंत 26 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. कोरोनापासून बचाव करायचा असेल तर लसीकरण हा एकमेव मार्ग आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, असे अग्रवाल यांनी सांगितले.
- पहिल्या लाटेवेळी 1 ते 10 वयोगटातील 3.28 टक्के मुले कोरोनाने बाधित झाली होती. दुसऱया लाटेवेळी हे प्रमाण 3.05 टक्के आहे.
- पहिल्या लाटेत 11 ते 20 वयोगटातील 8.03 टक्के मुले बाधित झाली होती तर दुसऱया लाटेत हे प्रमाण 8.5 टक्के इतके होते.
कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेटही सातत्याने कमी होत आहे. गेल्या 75 दिवसांनंतर ही परिस्थिती तयार झाली आहे.
-लव अग्रवाल, सहसचिव, पेंद्रीय आरोग्य मंत्रालय

























































