
मुंबईत कोरोना आटोक्यात आल्याचे समाधानकारक चित्र असून गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज होणाऱया 16 हजार चाचण्यांच्या तुलनेत सरासरी 3 टक्के म्हणजेच केवळ 480 रुग्ण आढळत आहेत. सुरुवातीच्या काळात मुंबईत कोरोना वाढत असताना चाचण्यांच्या तुलनेत तब्बल 30 ते 35 टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. दरम्यान, मृतांचा आकडाही चांगलाच कमी झाला असून गेल्या दहा दिवसांत तीन वेळा 3 आणि 4 मृतांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे 1 फेब्रुवारीपासून ठरावीक वेळेत सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू झाल्यानंतरही मुंबईत कोरोना आटोक्यात आहे.
पालिकेच्या माध्यमातून कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येणाऱया उपाययोजनांमुळे कोरोना रुग्णांची संख्या चांगलीच आटोक्यात आली आहे. मार्चमध्ये मुंबईत शिरकाव केलेल्या कोरोनाने जून-जुलै आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला उच्चांक गाठला होता.
दररोज पाच ते दहा हजार चाचण्या होत असताना अडीच हजारांपर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. मात्र यानंतर कोरोना रोखण्यासाठी सुरू करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, घरोघरी सर्वेक्षण, तपासणी, उपचार, जनजागृती, प्रभावी सॅनिटायझेशन, मास्क वापरण्याची सक्ती अशा उपाययोजनांमुळे कोरोना रुग्णसंख्या चांगली आटोक्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत चारशेहून कमी रुग्णसंख्याही नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे 14 ते 16 हजार कोरोना चाचण्या होत असताना सुमारे 400 पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत.
सरासरी रुग्णवाढ 0.13 टक्क्यांवर
- रुग्णसंख्या नियंत्रणात येत असतानाच मुंबईत सरासरी रुग्णवाढही चांगलीच कमी झाली आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत सरासरी रुग्णवाढ 0.13 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 94 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 555 दिवसांहून जास्त झाला आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 29 लाख 49 हजार 675 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
- यामध्ये एकूण सरासरी 10.50 टक्के या दराने 3,13,206 इतके पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 2 लाख 95 हजार 521 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, मुंबईत सद्यस्थितीत 5 हजार 369 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मात्र यातील 3 हजार 553 जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तर 1 हजार 519 जणांना लक्षणे असली तरी त्यांची प्रकृती ठणठणीत आहेत.


























































