
कोरोनासारखा भयंकर संसर्ग मानवाने या शतकात पाहिला नव्हता, अशी चिंता व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी, लोकांचे प्राण वाचविण्याकरिता लस अत्यावश्यक आहे, असे सांगितले. दरम्यान, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमाला नेपाळ आणि श्रीलंकेच्या पंतप्रधानांसह मान्यवर उपस्थित होते.
भगवान गौतम बुद्धांनी मानवतेची शिकवण जगाला दिली. मानवतेवर विश्वास असणाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. भगवान बुद्धांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. हवामान पद्धतीत बदल होत असून, ध्रुवांवरील बर्फ वितळत आहे. नद्या, जंगल संकटात आहेत. भगवान गौतम बुद्धांनी निसर्गाचा आदर करण्याची दिलेली शिकवण महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान काय म्हणाले?
- कोरोना हे जगावर आलेले मोठे संकट आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी लोकांचे प्राण वाचविण्याकरिता लस अत्यावश्यक आहे. कोरोना आल्यानंतर लसची निर्मिती होणे हे खूपच महत्त्वपूर्ण आहे. हिंदुस्थानातील शास्त्र्ाज्ञांचा अभिमान आहे.
- कोरोनानंतरचे जग आधीसारखे नसेल. कोरोनापूर्वी आणि कोरोनानंतर अशी चर्चा आता होईल. गेल्या वर्षभरात अनेक महत्त्वाचे बदल घडले. आता कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपण धोरण आखू शकतो.
- यावेळी पंतप्रधानांनी कोरोना लढाईत काम करणाऱया डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱयांचे आभार मानले. तसेच या महामारीत मृत्यू झालेल्यांप्रति शोक व्यक्त केला.

























































