उर्वरित आयपीएलचा खेळखंडोबा, विंडीज वगळता इतर परदेशी खेळाडू मुकणार

कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा चौदावा हंगाम अर्ध्यावरच स्थगित करावा लागला. उर्वरित स्पर्धा घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ची परदेशातही चाचपणी सुरू आहे. मात्र, त्याआधीच 6 देशांचे 53 परदेशी क्रिकेटपटू आयपीएलच्या राहिलेल्या 31 लढतींमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उर्वरित आयपीएलचा आता खेळखंडोबा होण्याची शक्यता बळावली आहे.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयोजन अवघड

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील उर्वरित लढतींसाठी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विंडो मिळू शकते. मात्र, याच दरम्यान इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान अॅशेस सीरिज होणार आहे. याचबरोबर आयपीएलचा लिलावही याचदरम्यान आहे. त्यामुळे या काळात उर्वरित आयपीएल घेणे जरा अवघड दिसते.

परदेशी क्रिकेटपटूंची गोची

  • इंग्लंड – इंग्लंड संघाला आगामी 3-4 महिन्यांत अनेक देशांचा दौरा करायचा आहे. जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळल्यानंतर इंग्लंडच्या संघाला एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱयावर जायचे आहे. त्यानंतर इंग्लंड 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरदरम्यान हिंदुस्थानविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. सप्टेंबरअखेरीस बांगलादेशविरुद्ध इंग्लंडला तीन वन डे आणि तितक्याच टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यानंतर टी-20 वर्ल्ड कप व अॅशेस मालिका आहे. त्यामुळे इंग्लंडचा प्रमुख खेळाडूंना आयपीएलसाठी परवानगी मिळू शकत नाही.
  • न्यूझीलंड – न्यूझीलंड संघाला नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध यूएईमध्ये 3 वन डे आणि 3 टी-20 सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळायची आहे. ही स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलली जाऊ शकत नाही. या मालिकेसाठी न्यूझीलंडचे खेळाडू आयपीएलमधून माघार घेऊ शकतात.
  • ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलियन संघ सप्टेंबरमध्ये रिकामा आहे. मात्र, ऑक्टोबरमध्ये या संघाला मायदेशात श्रीलंकेविरुद्ध 3-3 सामन्यांची वन डे आणि टी-20 मालिका खेळायची आहे. कोरोनाच्या संकटात आपल्या क्रिकेटपटूंना मायदेशी नेण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने सहकार्य केले नाही. त्यामुळे उर्वरित आयपीएलसाठी ते आपल्या खेळाडूंना परवानगी देतील असे वाटत नाही.
  • दक्षिण आफ्रिका – या संघाला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दोन दौरे करायचे आहेत. नेदरलॅण्ड संघाविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळल्यानंतर गतवर्षी मार्चमध्ये स्थगित झालेल्या हिंदुस्थानविरुद्धच्या मालिकेचीही भरपाई करून द्यायची आहे. ही मालिका ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ात होईल. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएल-2ला मुकण्याची शक्यता आहे.
  • बांगलादेश – सप्टेंबरच्या अखेरीस इंग्लंडचा संघ बांगलादेशच्या दौऱयावर येणार आहे. बांगलादेशसाठी ही अत्यंत महत्त्वाची मालिका असल्याने त्यांच्या दोन खेळाडूंना आयपीएलसाठी परवानगी दिली जाणार नाही.
  • अफगाणिस्तान – अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात पाकिस्तानविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे अफगाणी खेळाडूही आयपीएलला मुकण्याची शक्यता आहे.
  • वेस्ट इंडीज – या संघाला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोणतीच मालिका खेळायची नाही. त्यामुळे कायरॉन पोलार्ड, ख्रिस गेल, निकोलस पूरन, आंद्रे रस्सेल, शिमरोन हेटमायर, सुनील नरिन, फॅबियन एलेन, ड्वेन ब्राव्हो व जेसन होल्डर हे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतात. मात्र, इतर 6 देशांचे खेळाडू या उर्वरित स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत तर अनेक संघांची घडी विस्कटणार आहे. त्यामुळे बीसीसीआय याबाबतीत काय विचार करते यावरच सर्व काही अवलंबून आहे.
आपली प्रतिक्रिया द्या