पुन्हा किलबिलाट, दोन वर्षांनी शिशुवर्ग सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2020 साली ज्या विद्यार्थ्यांनी नर्सरीत प्रवेश घेतला होता त्यांच्यासाठी शाळा म्हणजे लॅपटॉप किंवा मोबाईलची स्क्रीन… कोरोनामुळे या विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांत शाळेत जाता आले नाही. मात्र यंदा पहिल्यांदाच या विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाली. शाळा कशी दिसते, शाळेत काय काय असतं याविषयी कुतूहल मनात ठेवत खाऊचा डबा, वॉटरबॅग घेऊन नर्सरी, केजी, बालवाडय़ांमधील चिमुकल्यांनी सोमवारी पहिल्यांदाच प्रत्यक्ष शाळेत हजेरी लावली. एरवी स्क्रीनवर दिसणाऱया शिक्षकांना समोर पाहून या मुलांना आनंद झाल्याचे त्यांच्या चेहऱयावर दिसत होते, तर काही जण शाळेत आपल्यासोबत आई-बाबा नसल्याने घाबरलेली दिसत होती.

मुंबई महापालिकेने पहिली ते बारावीबरोबरच केजीचे वर्गदेखील सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याने तब्बल दोन वर्षांनतर पहिल्यांदाच पूर्वप्राथमिक वर्गात शिकणारे विद्यार्थी शाळेत दाखल झाले. शाळांनी या विद्यार्थ्यांचे सुरेख स्वागत केले. बऱयाच शाळांनी गणवेशाची सक्ती केली नव्हती. त्यामुळे चिमुकले विद्यार्थी रंगीबेरंगी कपडय़ात शाळेत आले होते. पाठीवर दप्तर, गळ्यात वॉटरबॅग, तोंडावर मास्क लावलेली मुले शाळेच्या बाहेर रांगेत उभी असलेली दिसत होती. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र दिले आहे, अशा विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश दिला जात होता. विद्यार्थ्यांच्या स्वागताची शाळांनी जोरदार तयारी केली होती. मुलांचे औक्षण केले जात होते, तर काही शाळांनी केजीचे वर्ग फुगे, रंगीबेरंगी चित्रांनी सजवले होते. विद्यार्थ्यांसाठी बालगीतेही वाजत होती.

मुंबईतील 30 टक्केच नर्सरी सुरू

पालिकेने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी बहुसंख्या खासगी शाळांनी केजी आणि नर्सरीचे वर्ग सध्या तरी बंदच ठेवले आहेत. शाळांनी फेब्रुवारीपासून केजीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याचे नियोजन केले आहे. विक्रोळी येथील विकास हायस्कूलचे विश्वस्त विनय राऊत यांनी सांगितले, केजीचे वर्ग सध्या सुरू केलेले नाहीत. या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच पालकांना कोरोनाविषयक नियमांची माहिती शाळेकडून देण्यात येत आहे. केजीचे विद्यार्थी लहान असल्याने त्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेणे आवश्यक असून मुलांना काही आजार असल्यास त्याविषयीची माहिती तसेच पालकांचे लसीकरण झाले आहे का? याचा तपशील आम्ही घेत आहोत हे काम पूर्ण झाल्यावर फेब्रुवारीमध्ये शाळा सुरू होतील. भांडुप येथील अमरकोर विद्यालयानेदेखील केजीचे वर्ग सुरू केले असून 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यासाठी शाळा दोन सत्रांत भरत असल्याचे शाळेचे संचालक मारुती म्हात्रे म्हणाले.

मुंबईतील तब्बल 7 लाख 20 हजार 92 विद्यार्थी हजर

मुंबईमध्ये पहिली ते बारावीच्या वर्गामध्ये 16 लाख 35 हजार 370 विद्यार्थी आहेत. त्यानुसार पालकांची संमती घेऊन सुरू झालेल्या या वर्गांमध्ये सोमवारी 7 लाख 20 हजार 92 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संलग्न असलेल्या पहिली ते बारावीच्या 1774 शाळांपैकी 1731 शाळा पहिल्या दिवशी सुरू झाल्या. या शाळांमधील 9 लाख 82 हजार 860 विद्यार्थ्यांपैकी 5 लाख 26 हजार 452 विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. तर 34 हजार 486 शिक्षकांपैकी 31 हजार 353 शिक्षक उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेशी संलग्न असलेल्या पहिली ते दहावीच्या 2269 शाळांपैकी 2119 शाळा सुरू झाल्या. या शाळांमधील 6 लाख 52 हजार 510 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 93 हजार 640 विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली.

पहिली ते बारावीच्या वर्गांच्या वेळा वाढवल्या

मुंबईतील बऱयाच शाळांनी पहिली ते बारावीच्या वर्गांच्या वेळा वाढविल्या आहेत. सुरुवातीला दीड ते तीन तास शाळा भरत होती. या वेळेत अर्ध्या तासांनी वाढ करण्यात आली आहे. वार्षिक परीक्षा जवळ येत असल्याने शाळांनी आता तयारीवर भर दिला आहे. ऑनलाइन वर्गामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन काैशल्यावर परिणाम झाला असून आता ऑफलाइन शाळेत विद्यार्थ्यांच्या लिखाणावर भर देण्याचा शाळांचा प्रयत्न आहे. तसेच 50-50 टक्के उपस्थितीच्या नियमांमुळे विद्यार्थ्यांना एक दिवसआड शाळेत बोलावले जाणार असून ऑफलाइनबरोबच जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्गदेखील सुरू राहणार आहेत.

अभ्यासासोबत लसही…

मुंबईत सोमवारपासून पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या लसीकरणावरही भर देण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून माहीम येथील सरस्वती विद्यामंदिरात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. येत्या दोन दिवसांत शाळेतील सुमारे 500 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्याध्यापक मारुती चाबुकस्वार यांनी दिली.