
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. यामध्ये एच पूर्व म्हणजेच वांद्रे पूर्व, खार पूर्व आणि एफ उत्तर म्हणजेच माटुंगा, वडाळ्यात रुग्णवाढ दुपटीचा कालावधी 108 दिवसांवर पोहोचला आहे. ही स्थिती देशातील सर्वोत्तम असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, गोवंडी, कुर्ला अशा 8 विभागांत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अर्धशतकापर्यंत वाढला आहे.
महापालिकेच्या सर्व 24 वॉर्डचा विचार केल्यास रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे सरासरी प्रमाण हे 41 दिवस झाले आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विविध स्तरीय उपायोजना अव्याहतपणे राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ‘चेज द वायरस’ याअंतर्गत बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा अत्यंत प्रभावीपणे शोध घेत संबंधित व्यक्तींचे अलगीकरण करण्यासह सुनिश्चित कार्यपद्धतीची काटेकोरपणे अंमलबजावणी नियमितपणे करण्यात येत आहे. शिवाय ‘कंटेनमेंट झोन’मध्ये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच जनजागृती, निर्जंतुकीकरण, परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी, क्वारेंटाइन, घरोघरी जाऊन केलेले सर्वेक्षण, ज्येष्ठांची विशेष तपासणी यामुळेच हे यश आले आहे. विशेष म्हणजे मुंबईकरांच्या सहकार्यामुळेच हे यश आले असून त्यांचे सहकार्य यापुढेही असेच मिळेल असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
असा आहे रुग्ण दुपटीचा वेग
‘एम पूर्व’ विभाग (मानखुर्द – गोवंडी) 79 दिवस, ‘ई’ विभाग (भायखळा) 77 दिवस, ‘एल’ विभाग (कुर्ला) 73 दिवस, ‘बी’ विभाग (सँडहर्स्ट रोड) 71 दिवस, ‘ए’ विभाग (कुलाबा – फोर्ट) विभाग 70 दिवस, ‘एम पश्चिम’ (चेंबूर) 61 दिवस, ‘जी उत्तर’ (दादर) 61 दिवस आणि ‘जी दक्षिण’ (वरळी – प्रभादेवी) परिसराच्या 56 दिवसांनी रुग्ण संख्या दुप्पट होण्याच्या कालावधीचा समावेश आहे.





























































