
कोरोना व्हायरसच्या प्रकोपाचा सर्वाधीक फटका अमेरिकेच्या न्यूयॉर्कला बसला असून तेथे कोरोना रुग्णांची संख्या एक लाख 90 हजार झाली आहे. एका दिवसात 8 हजार 300 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्ययंत्रणांवर ताण येत आहे. तसेच या रोगाचा फैलाव रोखण्यास प्रशासनालाही अपयश येत आहे. या परिस्थितीत रुग्णांचे हाल होत आहेत. मात्र, मृत्यूनंतरही अनेक मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत आहेत. मृतांची संख्या वाढल्याने दफनभूमीची कमतरता जाणवत असून प्रशासनाने तात्पुरत्या दफनभूमीची सोय केली आहे.
न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे दररोज 700 ते 800 जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे रुग्णांलयांमध्ये मृतदेहांचा खच साचला आहे. मृतदेह ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा सुमारे 250 ट्रक असून शहरातील विविध रुग्णांलयांबाहेर त्या ठेवण्यात आल्या आहेत. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही दिवस मृतांच्या नातवाईकांची वाट बघण्यात येते. मात्र, आठवड्याभरात नातेवाईक आले नाही तर हार्ट आयलँडमध्ये मृतदेहांचे दफन करण्यात येत आहे. या ठिकाणी प्रशासनाने तात्पुरत्या दफनभूमीची व्यवस्था केली आहे.
अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांना मृतदेहाजवळ जाताना विशेष मास्क आणि संपूर्ण शरीर झाकले जाईल असा गाऊन देण्यात येत आहे. या नियमांचे पालन करून मृतदेहाचे दर्शन देण्यात येत आहे. त्यानंतरही नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी वाट बघावी लागत आहे. दफनभूमीत मोजक्याच नातेवाईकांना प्रवेश देण्यात येत आहे. दफनभूमीत एकाचवेळी अनेक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत असल्याने त्यांचे नियोजन करणे प्रशासनालाही अवघड होत आहे. त्यासाठी शहराबाहेर तात्परुत्या दफनभूमीची व्यवस्था करण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत दफनभूमी 24 तास सुरू ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
याआधी महिन्याभरात जेवढे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत होते, कोरोनाच्या प्रकोपामुळे तेवढे आता दोन तीन दिवसात येत असल्याने मतदेहाचे आणि त्यांच्या अंत्यसंस्कराचे नियोजन करणे कठीण असल्याचे दफनभूमीच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच गेल्या काही दिवसांपासून मृतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचेही सांगण्यात आले. मुस्लीम आणि हिंदुस्थानींनाही मृतांच्या अंत्यसंसस्कारासाठी अडचणी येत आहेत. न्ययॉर्क आणि न्यूजर्सीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुस्थानी नागरिक राहतात. आतापर्यंत 70 हिंदुस्थानींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.


























































