
जगभरात धुमाकुळ घालणारा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आता हिंदुस्थानातही होऊ लागला आहे. कोरोना विषाणुच्या प्रसाराची ही साखळी तोडून त्याला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची विविध मंत्रालये योग्यवेळी योग्य ती पावले उचलत आहेत. राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार आता रेल्वे, मेट्रो, बस सेवेत 50 टक्के कर्मचाऱ्यांवर काम सुरू ठेवण्यात आले आहे. आता पश्चिम रेल्वेने शुक्रवारी 20 मार्चपासून एसी लोकल पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर देखील 20 तारखे पासून पनवेल-ठाणे एसी लोकल बंद ठेवण्यात येणार आहे.
20 मार्चपासून पश्चिम रेल्वेवरून एसी लोकल धावणार नाहीत. मात्र त्याऐवजी साध्या लोकल त्यावेळात सोडण्यात येतील. ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही. तसेच हे पाऊल उचलल्यामुळे लोकलची संख्या कायम राहील असे देखील रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
























































