कोरोनाची मोबाईल ग्राहकांवरही संक्रांत, लॉकडाऊनमुळे देशात घटले 1.7 कोटी मोबाईल ग्राहक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमुळे हिंदुस्थानातील मोबाईल कंपन्यांना गेल्या 8 महिन्यांत आपले 1 कोटी 70 लाख ग्राहक गमवावे लागले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) ही माहिती दिली आहे.

कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका देशातील मोबाईल कंपन्यानाही बसला. मार्च 2020च्या तिमाहीत देशातील मोबाईल फोन ग्राहकांची संख्या

115.7 कोटी इतकी होती. पण या वर्षाच्या दुसऱया तिमाहीत मोबाईल ग्राहकांच्या संख्येत 1.7 कोटींची घट झाल्याचे दिसून आले. म्हणजेच कोटय़वधी मोबाईल ग्राहकांनी बेरोजगारी आणि उत्पन्नाचे साधन नसल्याने आपले मोबाईल कनेक्शन बंद केले अशी माहिती ट्रायने दिली आहे.

शहरात ग्राहक घटले, खेडय़ांत वाढले

कोरोनाचा प्रकोप देशातील शहरांना सर्वाधिक सहन करावा लागला आहे. त्यामानाने खेडय़ांत मात्र कोरोनाचा तितका प्रसार झाला नाही.त्यामुळेच यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत शहरांतील मोबाईल ग्राहकांची संख्या घटली आहे.

मात्र त्याच काळात ग्रामीण भागांतील खेडय़ांत मात्र मोबाईल ग्राहक वाढल्याचे ट्रायने स्पष्ट केले आहे. हि वाढ मोबाईल कंपन्यांच्या अपेक्षेनुसार कमीच असल्याचेहि ट्रायचे निरीक्षण आहे.