
राज्यातील शेकडो लोककलावंत, लोककलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोविड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. या सर्वांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या बैठकीत घेतला. राज्यातील सुमारे 56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे आर्थिक पॅकेज देण्यास मान्यता दिली असून यासाठी सुमारे 28 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘वर्षा’ निवासस्थान येथे सांस्कृतिक कार्य विभागाशी बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र कोविड संसर्गाशी लढा देत आहे. राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या कलाकारांना दिलासा देणाऱया निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यात सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास 8 हजार कलाकार असून राज्यात उर्वरित जिह्यात जवळपास 48 हजार कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना प्रती कलाकार 5 हजार रुपये मदत देण्यात येणार असून यासाठी जवळपास 28 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा,सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपथित होते.
समूह लोककलापथकांचे चालक मालक, निर्माते यांनाही एकरकमी विशेष अनुदान
राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत. कोविडमुळे वर्षभरात प्रयोग न झाल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे असून शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- हंगामी,दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाटय़, सर्कस आणि टुरिंग टॉकीज अशा जवळपास 847 संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार असून यासाठी 6 कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी 1 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.



























































