
देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा फटका नववर्षाच्या सुरुवातीलाच मनोरंजनसृष्टीला बसला आहे. शाहीद कपूरच्या ‘जर्सी’पाठोपाठ आता एस. एस. राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ या चित्रपटाचे प्रदर्शनदेखील लांबणीवर पडले आहे. शनिवारी निर्मात्यांनी सोशल मीडियावरून चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे, मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
‘आरआरआर’चे प्रदर्शन आतापर्यंत दोन वेळा पुढे ढकलले गेले आहे. सुरुवातीला हा चित्रपट गतवर्षी 30 जुलैला प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनामुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यानंतर नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 7 जानेवारी 2022 हा चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती, मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा फटका चित्रपटाला बसला आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रभास आणि पूजा हेगडेचा ‘राधे श्याम’ हा बिग बजेट चित्रपटाचे प्रदर्शनदेखील पुढे ढकलले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र हा चित्रपट 14 जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.




























































