
जगभरात कोरोनाने थैमान घातले असतानाच देशभरातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मात्र, मध्य प्रदेशातील खरगौन जिल्ह्यात बडगावमध्ये शुक्रवारी एकाच दिवशी 9 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या 9 कोरोनाबाधितांपैकी सहाजण एकाच गावातील आहेत. या सहाजणांना एकाच सलूनमधून कोरोनाचे संक्रमण झाल्याचे उघड झाले आहे. या सलूनमध्ये कोरोना संक्रमित झालेल्या व्यक्तीचा टॉवेल इतरांनाही वापरण्यात आल्याने गावातील 6 व्यक्तींना कोरोनाचे संक्रमण झाले आहे.
इंदूरच्या एका हॉटेलमधील वेटरचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात आला. संक्रमणाच्या काळात आपण बडगावमधील एका सलूनमधून दाढी आणि कटिंग केल्याची माहिती त्या वेटरने दिली. त्या सलूनमध्ये वेटरसाठी वापरण्यात आलेला टॉवेल आणि त्याला गुंडाळलेला कपडा इतर 8-10 जणांसाठी वापरल्याचे उघड झाले. त्यामुळे या सलूनमध्ये गेलेल्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बडगावमध्ये एकाचदिवशी कोरोनाचे 9 रुग्ण आढळल्यानंतर गाव सील करण्यात आले आहे. गावाच्या सीमा पर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 10 कोरोनाबाधित आढळले होते. शुक्रवारी जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 61 झाली असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

























































