हिंदुस्थानात कोरोनामुळे 50 लाख लोकांचा मृत्यू, अमेरिकेतील संशोधन संस्थेचा खळबळजनक दावा

ऑक्सिजनअभावी एकाचाही मृत्यू झाला नाही असा दावा करणाऱया केंद्र सरकारकडून कोरोना मृत्यूचेही आकडे लपविले जात आहेत असे आरोप होऊ लागले आहेत. हिंदुस्थानात कोरोनामुळे 4 लाख मृत्यू झाल्याचे सरकार सांगत असले तरी तब्बल 50 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष अमेरिकेतील संशोधन संस्थेने केला आहे.

वॉश्ंिाग्टन येथील ‘सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट’ या संस्थेने मंगळवारी खळबळजनक अहवाल जाहीर केला. केंद्र सरकारची आकडेवारी, आंतरराष्ट्रीय संशोधकांचे अंदाज, सीरोलॉजिकल रिपोर्टस् आणि घरोघरी जाऊन केलेली पाहणी याआधारे अहवालात निष्कर्ष काढण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, अभिषेक आनंद आणि जस्टिन सँडफर यांनी हा अहवाल तयार केला आहे. फाळणीनंतर स्वतंत्र हिंदुस्थानात सर्वाधिक मृतांची संख्या कोरोना महामारीत झाली असे, या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे.

सरकारच्या आकडेवारीपेक्षा मृतांची संख्या दहापट अधिक

  • कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक घातक ठरली. हिंदुस्थानात सरकारने जाहीर केलेल्या मृतांच्या 4 लाख संख्येपेक्षा प्रत्यक्ष संख्या दहापटीपेक्षा अधिक आहे. 39 ते 49 लाख लोकांचा कोरोनामुळे हिंदुस्थानात मृत्यू झाला.
  • अभ्यासाद्वारे तीन रूपरेषा तयार करून अहवालात निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे जगभरात चिंता वाढल्याचेही नमूद केले आहे.
  • दुसरा निष्कर्ष सीरो सर्वेक्षणाच्या आधारे काढला आहे. रुग्णांचे वय आणि संसर्ग झाल्यानंतर मृत्यूचा दर यास आंतरराष्ट्रीय मानकांचा अंदाज लागू केल्यास मृतांची संख्या 40 लाख होते.
  • तिसरा निष्कर्ष हा ग्राहक पिरॅमिड घरगुती सर्वेक्षणाच्या विश्लेषणावर आधारित आहे. सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट या संस्थेने सर्व राज्यांचा अभ्यास केला. त्याआधारे मृतांची संख्या 49 लाखांच्या वर जाते.
आपली प्रतिक्रिया द्या