कोरोनामुळे वाढताहेत ब्रेकअप्स – घटस्फोट! तज्ज्ञांनी दिला हा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीमुळे सध्या सगळं जग वेठीला धरलं गेलं आहे. या दरम्यान वाढत्या सामाजिक, आर्थिक तणावामुळे ब्रेकअप आणि घटस्फोटांचं प्रमाण वाढल्याचं वृत्त आहे.

बीबीसीच्या एका अहवालानुसार, ज्या जोडप्यांनी यापूर्वी कधीच घटस्फोटाचा विचारही केला नव्हता, त्यांचे आता घटस्फोट होऊ लागले आहेत. सोफी टर्नर नावाच्या महिलेच्या वैवाहिक जीवनाचं उदाहरण या अहवालात देण्यात आलं आहे. सोफी आणि तिच्या पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. कोरोना संकटापूर्वी त्यांनी कधीच एकमेकांपासून वेगळं होण्याचा विचार केला नव्हता. पण, या कोरोनाच्या लॉकडाऊन काळात मात्र त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलं.

ब्रिटनची एक लॉ फर्म असलेल्या स्टीवॉटर्सच्या म्हणण्यानुसार, जुलै ते ऑक्टोबर दरम्यान घटस्फोटांच्या प्रक्रियेसाठी तब्बल 122 टक्के अधिक चौकशी झाली आहे. आपलं नातं संपुष्टात आणण्यासाठी ऑनलाईन सल्लागारही शोधले जात आहेत.

अमेरिकेतील लॉ फर्मच्या माहितीनुसार, घटस्फोटाच्या करारपत्रांच्या विक्रीत 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हीच परिस्थिती चीन, स्वीडन या देशांमध्येही पाहायला मिळत आहे.

तज्ज्ञांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. कोरोनामुळे अनेकांना आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे रोजच्या जगण्यातले ताण वाढले आहेत. आर्थिक पातळीवरही ताण जाणवत आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम लोकांच्या नात्यावर झाला आहे. त्यामुळे लोक विभक्त होण्याचा पर्याय स्वीकारत आहेत.

या बदलत्या नातेसंबंधांवर तज्ज्ञांनीही एक सावधानतेचा इशारा दिला आहे. कोरोनामुळे झालेल्या या बदलांचा परिणाम अजूनही काही काळ जाणवणार असून एक वेळ अशी येईल की त्याची अत्युच्च पातळी गाठली जाईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.