जुने व्हायरस परत आलेत… साइड इफेक्ट पसरवताहेत, बंदोबस्त करायचा आहे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे संकट अजूनही पूर्ण गेलेले नाही. सावधपणे पावले टाकतोय. नवे व्हायरस येत आहेतच, पण काही जुने व्हायरस परत आलेत. हे जुने व्हायरस कारण नसताना साइड इफेक्ट पसरवण्याचा प्रयत्न करताहेत. त्या व्हायरसचा आणि या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळातही राजकारण करणाऱ्या विरोधकांना लगावला आहे.

कोरोनाकाळात संसर्ग पसरू नये यासाठी राजकीय कार्यक्रम तसेच यात्रांवर बंदी आहे. मात्र असे असतानाही भाजपकडून जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली. एकीकडे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असतानाच विरोधकांकडून सुरू असलेल्या घाणेरडय़ा राजकारणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘इंडियन एक्प्रेस’ समूहाने आयोजित केलेल्या उद्योजकांच्या परिषदेत समाचार घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जगभराचा अनुभव घेतल्यानंतर 100 दिवसांनंतर कोरोनाचा व्हायरस पुन्हा डोके वर काढतो. त्यामुळे मधला काळ अर्थचक्राला गती देण्यासाठी वापरला पाहिजे. काहीजण सांगतात तुम्ही हे उघडले तर ते का नाही उघडत. जरा थांबा, आपणाला एक एक टप्प्याने सगळेच उघडायचे आहे. कोणाला बंधनात ठेवायचे नाही. हळुवारपणे मास्कसुद्धा काढून ठेवायचा आहे, पण तो घाईघाईत काढला तर मग आपण कधीच मास्क काढू शकणार नाही.

तुमचं राजकारण चालू राहील, पण जनतेसमोर रोजीरोटीची भ्रांत आहे

इथे सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलावून जाणीव करून द्यायला पाहिजे की, तुमचं राजकारण चालू राहील, पण आज जनतेसमोर त्यांच्या रोजीरोटीची भ्रांत आहे. त्याचं पहिलं काय करणार ते सांगा. जर रोजीरोटी मिळाली नाही तर संपूर्ण राज्यात, देशात आणि जगात अस्वस्थता आणि अस्थिरता माजल्याशिवाय राहणार नाही, असा सावधगिरीचा इशारा राजकीय पक्षांना देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या रोजीरोटीसाठी मला पुढच्या काळामध्ये या उद्योजकांची आणि उद्योगाची आपल्या राज्यामध्ये फार मोठी गरज असल्याचे सांगितले.