
मुंबईत ओमायक्रोनबाधितांची संख्या 14 डिसेंबरपर्यंत 12 वर गेल्यामुळे पालिकेने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आता ओमायक्रोनबाधितांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झालेल्यांचीही ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आतापर्यंत ओमायक्रोनबाधितांच्या संपर्कातील सर्व 60 जणांचा कोरोना ‘आरटी-पीसीआर’ चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने तूर्तास दिलासा मिळाला आहे.
मुंबईत ‘रिस्क कंट्रीज’मधून आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन कोरोना ‘आरटी-पीसीआर’ चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये बाधित आढळणाऱयांची ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ चाचणी करण्यात येत आहे. दरम्यान, निकट संपर्कातील 60 जण निगेटिव्ह आले तरी सात दिवसांनी पुन्हा ‘आरटी-पीसीआर’ चाचणी करण्यात येणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.
297 नमुन्यांमध्ये 103 डेल्टा पॉझिटिव्ह
महापालिकेच्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांमध्ये 297 पैकी 103 रुग्ण डेल्टा पॉझिटिव्ह आढळले आहेत. नमुन्यांपैकी 62 टक्के म्हणजेच 183 नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे तर 35 टक्के म्हणजेच 105 नमुने हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ या उपप्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहेत. तसेच 2 टक्के म्हणजेच 7 नमुने हे ओमायक्रोन या उप प्रकाराने व उर्वरित 1 टक्के नमुने हे इतर उप प्रकारांनी बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.
सहाव्या फेरीतील चाचण्यांचे निष्कर्ष
- 297 रुग्णांपैकी 35 टक्के म्हणजेच 103 रुग्ण हे 21 ते 40 या वयोगटातील
- 27 टक्के म्हणजेच 80 रुग्ण हे 41 ते 60 या वयोगटातील
- 23 टक्के म्हणजेच 68 रुग्ण हे 61 ते 80 या वयोगटातील
- 297 पैकी 19 रुग्णांनी लशीची पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी 3 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी कोणालाही ऑक्सिजनची गरज भासली नाही किंवा अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले नाही.
- लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या 194 रुग्णांपैकी 33 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एका रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली, तर दुस-या एका रुग्णाला अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले.
- एकूण रुग्णांपैकी 84 रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी 22 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
राज्यात आणखी चार ओमायक्रोनबाधित
राज्यात आज आणखी चार ‘ओमायक्रॉन’बाधित आढळले आहेत. या चार ‘ओमायक्रॉन’बाधित रुग्णांमध्ये धाराशीवमधील दोन जण, मुंबईमध्ये एक आणि बुलढाणा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. चार रुग्णांमध्ये तीन पुरूष व एक महिला आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या आता 32 वर पोहचली आहे. आजपर्यंत आढळलेल्या 32 ओमायक्रॉनबाधितांमध्ये मुंबई-13, पिंपरी चिंचवड-10, पुणे – 2, उस्मानाबाद -2, कल्याण-डोंबिवली – 1, नागपूर-1.
कोरोनाबाधित सेलिब्रेटींच्या संपर्कातील 110 जण निगेटिव्ह!
करीना कपूर, अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पालिकेने त्यांच्या संपर्कात आलेले नोकर, घरकामगार, ड्रायव्हर आणि निकट संपर्क आलेल्या 110 जणांची कोरोना ‘आरटी-पीसीआर’ चाचणी केली असून ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी पूर्ण सील करण्यात आलेल्या इमारतींच्या ठिकाणचे निर्बंध कमी करून पूर्ण बिल्डिंग नाही तर आता रुग्ण आढळलेले मजलेच सील करण्यात येणार आहेत. दरम्यान, दिग्दर्शक करण जोहर याने आपली आणि कुटुंबाची कोरोना ‘आरटी-पीसीआर’ चाचणी निगेटिव्ह आल्याचे ट्विट केले आहे.
नववर्षाच्या पाटर्य़ांना परवानगी नाही
राज्यावरील ओमायक्रोनचे संकट लक्षात घेऊन यंदा 31 डिसेंबरच्या नववर्षाच्या पार्टींना परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज दिली. मुंबईकरांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. अस्लम शेख म्हणाले की, मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पाटर्य़ांचे आयोजन होते. पण सध्या वाढत असलेल्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता कोणत्याही पार्टीला किंवा गर्दी होईल अशा गोष्टींना परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोविडच्या नियमांचे पालन करून धार्मिक स्थळांना परवानगी देण्यात आली असल्याचे ते म्हणाले.


























































