लेख – कोरोनाच्या संकटात पुस्तकांचे बळ

870

>> प्रा. मिलिंद जोशी

कोरोनाच्या या संकटाने माणसाला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले. भौतिक प्रगतीची शिखरे गाठूनही या जगात आपण किती क्षुल्लक आहोत आणि सारे कसे अशाश्वत आहे याची जाणीव करून दिली. थोडे थांबायला आणि आत्मचिंतन करायला भाग पाडले. अशा कसोटीच्या काळात पुस्तकं माणसांना लढण्यासाठी बळ देत आहेत.

आज संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले आहे. आपल्या केंद्र आणि राज्य सरकारने या विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून आवश्यक ती सर्व खबरदारी वेळीच घेतली. टाळेबंदी जाहीर केली. डॉक्टर्स, पोलीस, अत्यावश्यक सेवा देणारे सेवक त्यांचा जीव धोक्यात घालून बाहेर कोरोनाच्या संकटाशी दोन हात करीत आहेत. लोकांना घरीच राहून आपली आणि कुटुंबाची काळजी घेत या विषाणूविरुद्ध लढायला सांगितले आहे. वर्षानुवर्ष अंगवळणी पडलेली धावपळीची जीवनशैली आणि सवयीची गुलामगिरी यामुळे सक्तीने वाट्याला आलेले हे निवांतपण अनुभवताना अनेकांना आठवण झाली ती पुस्तकांची. ज्या काळात दूरचित्रवाणी संच घरोघरी नव्हता, मोबाईल, फेसबूक, व्हॉट्सऍपसारखी वेळखाऊ माध्यमे नव्हती. कारणाशिवाय घराबाहेर फिरण्याचे, वेळ घालवायचा म्हणून हॉटेलात खाण्याचे स्तोम माजलेले नव्हते त्यावेळी वाचन हेच मनोरंजनाचे आणि चांगल्या पद्धतीने वेळ घालविण्याचे एकमेव साधन सर्वमान्य होते. त्यावेळी वाचन हा समाजाचा केवळ छंद नव्हता, तर तो जीवनशैलीचा एक भाग होता. नंतर जीवनाचा वेग वाढला. विशेषत: जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर जगण्याचे प्राधान्यक्रम बदलले. त्यात वाचनाला खालचे स्थान मिळाले. वेळच मिळत नाही हे कारण सांगितले गेले. आता कोरोनामुळे आलेले सक्तीचे निवांतपण अनुभवताना पुस्तकं वाचावीत असे लोकांना वाटणे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर लोकांचे दूरध्वनी येऊ लागले, ‘सर, काही चांगली पुस्तकं सुचवा ना, जी वाचलीच पाहिजेत. मनात आशा निर्माण होईल, वृत्ती सकारात्मक बनेल, .या निराशा आणि भीती वाढविणाऱ्य़ा परिस्थितीत बळ वाढेल अशी पुस्तकं सुचवा.’ एका गोष्टीचे समाधान वाटले की पुस्तकं बळ वाढवतात यावर अजूनही समाजाचा विश्वास आहे. मुलांना वाचता येतील किंवा वाचून दाखवता येतील अशा पुस्तकांसाठी विचारणा होऊ लागली. काही लेखकांनी आणि प्रकाशकांनी स्वत: पुढाकार घेऊन मोफत ई- पुस्तके उपलब्ध करून दिली. आपल्या सोसायटीतल्या पुस्तकवेड्या कुटुंबांचा लोक शोध घेऊ लागले.पुस्तके वाचण्यासाठी मिळावीत यासाठी विनंती करू लागले. माझ्या सोसायटीत पुस्तकप्रेमी मंडळींनी घरातल्या सर्व वयोगटातील सदस्यांना वाचता येतील, महिनाभर पुरतील एवढी पुस्तकं माझ्याकडून नेली. ज्या पुस्तकांवर अनेक वर्षात हात फिरला नव्हता अशी पुस्तके बाहेर आली. ऑडिओ बुकची निर्मिती करणाऱ्य़ांनी पुस्तके ऐकण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली. लहान मुले आणि वयस्कर माणसे यांच्यासाठी ती खूप उपयुक्त ठरत आहेत. घराचे वाचनप्रेम वाढते आहे ही निश्चितच दिलासा देणारी बाब आहे. पुस्तकांमुळे माणसांची मने प्रज्वलित होतात. निराशेचं मळभ दूर होतं. पुस्तक वाचत असताना वाचक त्या आशयाशी इतका एकरूप होतो की, त्याक्षणी त्या पुस्तकातले जीवन तो जगतोय असं त्याला वाटत असतं. हा परकाया प्रवेश त्याला सगळी दु:ख, वेदना विसरायला लावत असतो. हाच अनुभव लोक सध्या घेत आहेत. हे वाचनप्रेम या संकटातून बाहेर पडल्यावरही टिकून राहावे हीच अपेक्षा. या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून आपण लिहिलं पाहिजे असं अनेकांना वाटतंय. लेखकांना असं वाटणं स्वाभाविक आहे, पण ज्यांनी आयुष्यात कधीही लिहिण्याचा प्रयत्न केला नव्हता त्यांना लिहावं वाटणं हेही तितकंच महत्वाच आहे. तेदेखील लिहिते झालेत. कोरोनाच्या या संकटाने माणसाला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले. भौतिक प्रगतीची शिखरे गाठूनही या जगात आपण किती क्षुल्लक आहोत आणि सारे कसे अशाश्वत आहे याची जाणीव करून दिली. थोडे थांबायला आणि आत्मचिंतन करायला भाग पाडले.अशा कसोटीच्या काळात पुस्तकं माणसांना लढण्यासाठी बळ देत आहेत.

(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या