कोरोनाचे चक्रव्यूह भेदून शिक्षणाची गाडी रूळावर, पश्चिम महाराष्ट्रात शाळांचा प्रवेशोत्सव उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे गेली दोन वर्षे न झालेला शाळांचा प्रवेशोत्सव आज पश्चिम महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे हे चक्रव्यूह भेदून शिक्षणाची गाडी रुळावर आली आहे. नवा गणवेश, नवी पुस्तके, नवे दप्तर अशी तयारी करून नव्या सवंगडय़ांना भेटण्याची उत्सुकता चेहऱयावर घेऊन बालचमू आज शाळेत दाखल झाले. तर, वरच्या वर्गांतील विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर जुन्या मित्रांना भेटण्याची आतुरता दिसून येत होती. पहिल्याच दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय दिसून येत होती. दरम्यान, राज्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घेण्याचा आदेश शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आला आहे.

साताऱयात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

सातारा जिल्ह्यात शाळेचा पहिला दिवस सर्वत्र उत्सवाप्रमाणे सळसळत्या उत्साहाचा ठरला. शाळांमध्ये नवागतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत झाले. त्याचवेळी शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात शिक्षण विभागाच्या नियोजनाप्रमाणे पाठय़पुस्तकेही मिळाल्यामुळे विद्यार्थी हरखून गेले. कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे गेली दोन वर्षे शैक्षणिक जगत कोलमडून पडले होते. त्यामुळे जूनपासून सुरू होणाऱया शैक्षणिक वर्षाचे गणित बिघडले होते. ऑफलाइनच्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाचा आधार घ्यावा लागला होता. आता कोरोना संकट निवळल्याने जूनच्या दुसऱया आठवडय़ात शाळा सुरू होण्याची परंपरा पूर्ववत झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्गातही समाधानाचे वातावरण आहे.

नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ आज शाळा-शाळांमध्ये उत्साहात झाला. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे बालगोपाळांमध्ये अपूर्व उत्साह पाहायला मिळाला. नवीन प्रवेश घेतलेल्या बालकांमध्ये शाळेबद्दलचे आकर्षण, अप्रूप, आनंद तसेच पालकांच्या सुरक्षित कवचातून बाहेर पडावे लागत असल्याबद्दलची अस्वस्थता अशा संमिश्र भावनांचे भाव पाहायला मिळाले. सातारा जिल्ह्यात 830 माध्यमिक शाळा तसेच गावोगावच्या प्राथमिक शाळांमध्ये उत्साहाचे उधाण पाहायला मिळाले. शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाबपुष्प हाती देऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले. त्याचवेळी मुलांना नवी कोरी पाठय़पुस्तकेही देण्यात आली. या अनोख्या स्वागताने आणि हाती मिळालेल्या पुस्तकांमुळे मुले अक्षरशः हरखून गेली. माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर या आज पहिल्याच दिवशी पाटखळ, वडूथ, वासोळे येथील शाळांमधील नवागतांच्या स्वागत सोहळ्यात सहभागी झाल्या.

नगरमध्ये औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत

नगर जिल्ह्यात आज शाळांकडून विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळा सुरू झाल्याने शाळांचा परिसर गजबजून गेला आहे.

आजपासून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. खऱया अर्थाने सोमवारपासूनच शाळा उघडल्या आहेत. दोन दिवसांपासून शिक्षकांनी शाळेत हजेरी लावली असून, शाळांची स्वच्छता इतर कामे उरकण्यात आली आहेत. जिल्ह्यात 1 मे पासून शाळांना सुटय़ा लागल्या होत्या. या सुटय़ा 14 जून रोजी संपल्या असून, आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक सत्राची तयारी केली आहे. सोमवारपासूनच शिक्षक शाळेत उपस्थित झाले असून, नवीन शैक्षणिक सत्राची तयारी करण्यात आली आहे. आज शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. बऱयाच दिवसांनंतर शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर उत्साह दिसून येत होता. शाळेचा पहिला दिवस असल्याने पालकांनीही शाळेच्या आवारात गर्दी केली होती. जिल्हा परिषदेच्या शाळेतील व अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.

सांगलीतील शाळांमध्ये 80 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

सांगली शहरासह जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थी उत्साहाने दाखल झाले. जिल्हा परिषद शाळांसह माध्यमिक विभागाच्या तीन हजार शाळांमध्ये पहिली घंटा वाजली. प्राथमिक शाळांमध्ये 80 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहिली. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

जिल्ह्यातील तीन हजार शाळांची घंटा आज वाजली. त्यामध्ये प्राथमिकच्या 1688, खासगी 450, माध्यमिकच्या 724 शाळा आहेत. सुट्टीनंतर शाळांच्या परिसरात पुन्हा मुलांचा किलबिलाट सुरू झाला असून, पालक आणि मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुलांना मोफत पुस्तके देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिल्या दिवशी 1 लाख 20 हजारांपैकी 96 हजार 230 विद्यार्थी उपस्थिती होती. त्याचे प्रमाण 80 टक्के राहिले.

शाळेच्या पहिल्या दिवशी शिराळा तालुक्यातील चिखली येथे आमदार मानसिंगराव नाईक यांनी मॉडेल स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकांचे वाटपही करण्यात आले. शिक्षण उपसंचालक महेश चोथे आणि शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱयांनी कडेगाव तालुक्यातील खेराडेवांगी, खानापूर तालुक्यातील नागेवाडी आणि हिंगणगाव येथील प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. याशिवाय प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी मिरज तालुक्यातील कवलापूर येथील प्राथमिक शाळा क्रमांक 2ला भेट दिली.

सोलापुरात बैलगाडीतून वाजतगाजत आले विद्यार्थी

सोलापूर तब्बल दोन वर्षांनंतर शाळा सुरू झाल्याने शहर व जिल्ह्यात अनेक शाळांनी अनोख्या उपक्रमाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. फुलांचा वर्षाव, औक्षण, सेल्फी पॉइंट, बैलगाडीतून मिरवणूक व खाऊवाटपाने मुले भारावून गेली होती.

कोरोनानंतर आरोग्याची काळजी घेत शहर व जिल्ह्यातील शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. वर्ग सजावटीसह शाळा परिसर आकर्षक रंगरंगोटीने खुलून गेल्या होत्या. सम्राट चौकातील श्री. चतुराबाई विद्यालयात फुलांच्या पायघडय़ा घालून पुष्पवृष्टी व औक्षण करून मुलांचे स्वागत करण्यात आले. शाळेने तयार केलेले ‘सेल्फी पॉइंट’ विद्यार्थ्यांना आकर्षून घेत होते. विजापूर रोडवरील निर्मलाताई ढोकळ प्रशालेत रंगीबेरंगी फुगे व फुलांनी वर्ग व प्रवेशद्वार सजविण्यात आले होते. ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांचे स्वागत मोठय़ा जल्लोषात करण्यात आले. अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाववाडी येथे शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या पहिलीच्या मुलांची गावातून बैलगाडीत बसवून मिरवणूक काढत शाळेत आणण्यात आले.

सोलापूर महापालिकेच्या 58 शाळा सुरू

महापालिकेतील 58 शाळांत सुमारे पाच हजार 900 किद्यार्थी आहेत. महापालिका शिक्षण मंडळाच्या कतीने किद्यार्थ्यांचे स्कागत करण्यात आले. माजी नगरसेकक सुनील खटके आणि पालिका शिक्षक पाटील यांनी स्कतःच्या कारमधून किद्यार्थ्यांना शाळेत आणले.

कोल्हापुरात मिठाईचे वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत

कोल्हापूर – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर, मास्क अशा काटेकोर नियमात सुरू झालेल्या शाळा यंदा मास्कविना मुक्त वातावरणात पूर्ववत सुरू झाल्या. 13 जूनपासून शाळा सुरू झाल्या असल्या, तरी प्रत्यक्षात आजपासून शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. उत्साही वातावरणात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

कोरोनाकाळानंतर पहिल्यांदाच प्राथमिक, माध्यमिकसह इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आज विद्यार्थी प्रवेशोत्सव झाला. नवीन पाठय़पुस्तके, गणवेश, पोषण आहार तसेच मिठाईवाटप करून, विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळांची रंगरंगोटी, सुशोभीकरण करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या 2 हजार 648 प्राथमिक शाळा असून, 2 लाख 98 हजार विद्यार्थी आहेत. माध्यमिकच्या एक हजार 58 शाळा, तर तीन लाख 50 हजार विद्यार्थी आहेत. महापालिकेच्या 58 शाळांमध्ये 10 हजार 700 विद्यार्थ्यांनी आज पहिल्या दिवशी शाळेत हजेरी लावली. शिक्षण अधिकाऱयांसह जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱयांनी विविध शाळांना भेटून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

नेहरूनगर शाळेत विद्यार्थी आले ‘लंडन बस’ने

शाळेच्या पहिल्या दिवशी महापालिकेच्या वतीने सर्व शाळांमध्ये मोठय़ा उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नेहरूनगर शाळेत दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने नवीन विद्यार्थांचे स्वागत केले जाते. यावर्षी ‘लंडन बस’ने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांचे ढोल-ताशांच्या गजरात मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर महानगरपालिका शाळास्तरावर राबविला जाणार असलेला ‘मी इंग्रजी बोलणार’ व ‘गणित झाले सोपे’ या उपक्रमांच्या हस्तपुस्तिकांचे वाटपही करण्यात आले.