कोरोनाचा विळखा सुटतोय! पॉझिटिव्ह रुग्णांमधील 95 टक्के रुग्णांची प्रकृती ठणठणीत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
swab-test-corona-test
प्रातिनिधिक फोटो

मुंबईत कोरोना आता चांगलाच आटोक्यात आला असून सध्याच्या 19 हजार 721 सक्रिय रुग्णांपैकी तब्बल 11 हजार 553 रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसून 7100 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असली तरी त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.

म्हणजेच एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 18 हजार 653 म्हणजेच 95 टक्के रुग्णांना कोरोनाचा आता कोणताही धोका नाही. दरम्यान, 1068 जणांमध्ये मात्र तीव्र लक्षणे असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी

मुंबईत ऑगस्टअखेरपासून आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. यामध्ये घरोघरी सर्वेक्षण, तपासणी आणि जनजागृतीमुळे कोरोनाला आळा घालण्यात पालिकेला चांगलेच यश आले आले आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत मुंबईत एकूण रुग्णसंख्या 251283 पर्यंत पोहोचली असली तरी यातील तब्बल 2 लाख 20 हजार 165 म्हणजेच 88 टक्के रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णवाढ रोखण्यामध्ये पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या नियोजनातून राबवण्यात येणाऱ्य़ा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे मोठे योगदान असल्याचे बोलले जात आहे.

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात एका महिन्यांत 7 टक्के वाढ

मुंबईत रुग्णसंख्या घटली असताना आता रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही चांगलीच वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्के होते. मात्र एका महिन्यात पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणा 26 ऑक्टोबर रोजी 88 टक्क्यांवर पोहोचले आहे.

याशिवाय कोविड वाढीचा सरासरी दर 1.11 वरून 0.53 टक्क्यांपर्यंत खाली आला. तर  रुग्ण दुपटीचा कालावधी गेल्या एका महिन्यात 63 दिवसांवरून 132 दिवसांवर पोहोचला आहे.