सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाला घरी पाठवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलेला पहिला कोरोना रुग्ण आता कोरोनामुक्त झाल्याने त्याला गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णाने डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मंगलोर एक्सप्रेसने प्रवास करून मुंबईतून जिल्ह्यात आलेल्या या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे 26 मार्चला निदर्शनास आले होते. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी केंद्र शासनाच्या सूचनावलीनुसार त्याच्यावर उपचार सुरू केले होते.

आता 14 दिवसांनी त्याचा स्वॅब घेऊन पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याचा अहवाल निगेटीव्ह आला. त्याचे 24 तासाच्या अंतराने घेतलेले दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यानंतर त्याला गुरुवारी सामान्य रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, संजय पडते आदींसह रुग्णालयातील कोवीड–19 वॉर्डमधील कर्मचारी उपस्थित होते.