
कोरोनाचा शिरकाव आता भिवंडीतही झाला आहे. एका 65 वर्षांच्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या रुग्णाला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हा रुग्ण राहत असलेला आजूबाजूचा एक किलोमीटर पर्यंतचा परिसर महापालिकेने सील केला आहे. संवेदनशील व यंत्रमाग नगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात शुक्रवारपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र शनिवारी एका वृद्ध इसमाला कोरोना झाल्याचे दिसून आल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शहरातील हा पहिला कोरोनाबाधीत रुग्ण काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे एका कार्यक्रमात गेला होता. सतर्कता म्हणून त्याला चार ते पाच दिवसांपूर्वीच भिवंडीतील क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात आले होते. मात्र, आता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याने त्याच्या कुटुंबातील दोन महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलालाही कॉरंटाईन करण्यात आले आहे.


























































