दिव्यात कोरोनाची एण्ट्री; ठाणे पालिका क्षेत्रात दिवसभरात 5 नव्या रुग्णांची भर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळवा, मुंब्रा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असताना सर्वाधिक दाटीवाटी असलेल्या दिवा प्रभागातही आता कोरोनाने एण्ट्री केली आहे. शनिवारी दिवसभरामध्ये ठाणे पालिका क्षेत्रामध्ये पाच नवीन रुग्णांची भर पडली असून कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा आता 44 च्या घरात गेला आहे. रुणांमध्ये पोलीस व डॉक्टरांचाही समावेश आहे. चिंतादायक म्हणजे मुंब्रा, कळव्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असतानाही आतापर्यंत या शहरांना खेटून असलेला दिवा अपवाद ठरला होता. मात्र आज येथेही रुग्ण सापडल्यामुळे दिवावासियांच्या चिंतेत भर पडली आहे.

कोरोनाला आटोक्यात ठेवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी या विषाणूची लागण झपाट्याने होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. विशेष म्हणजे याची लागण आता पोलीस व डॉक्टरांनाही होत असल्याचे समोर आल्याने चिंतेत भर पडली आहे. शुक्रवारपर्यंत ठाणे शहरात एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नसल्याने समाधान व्यक्त केले जात होते. मात्र शनिवारी अचानक शहरामध्ये चार तर पहिल्यांदाच दिवा प्रभागामध्ये एक असे एकूण 5 नवीन रुग्ण आढळले आहेत. दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी येथील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर पालिका प्रशासनाची फौज तेथे दाखल झाली आहे. दरम्यान ढोकाळी येथे एका डॉक्टरला तर कळव्यातील रहिवासी असलेल्या ठाणे पोलीस अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या 44 झाल्याने कोरोना रोखण्यासाठी पालिकेने प्रभाग समितीनिहाय बाह्यरुग्ण विभाग तयार केला आहे. कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी येथे करण्यात येणार आहे.