भय इथले संपत नाही….अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ

कोरोनाचे संकट वाढत आहे. त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिका, ब्राझील आणि हिंदुस्थानमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. युरोपमधील काही देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून गेल्या गेल्या 10 दिवसात रशियासह युरोपात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातच कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आता अमेरिकेची चिंता वाढली आहे. अमेरिकेत पुन्हा दिवसभरात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.

अमेरिकेत शुक्रवारी 84, 218 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी 76,195 नवे कोरोनाबाधित आढळले होते. अमेरिकेत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,30,068 वर गेली आहे. अमेरिकेत कोरोनाचा असाच प्रकोप सुरू राहिला तर फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 5 लाखांवर पहचेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असूनही तेथील सरकार आणि प्रशासन गंभीर नसल्याचे संशोधकांनी सांगितले. अमेरिकेत अनेकजण मास्क वापरत नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यात येत नाही. तसेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक प्रचारामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी कोरोनाबाधितांच्या दिवसभरातील संख्येने विक्रम केला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने अमेरिकेची चिंता वाढली आहे.

कोरोनावर सुरक्षित आणि प्रभावी लस विकसीत करण्याचे काम अनेक देशात सुरू आहे. त्यातच एका संशोधनातून दिलासा मिळाला आहे. कोरोना व्हायरस क्षीण होत असून लवकरच तो संपुष्टात येईल, असा दावा काही संशोधकांनी केला आहे. मात्र, कोरोनावर प्रभावी लस येईपर्यंत अमेरिकेमध्ये कोरोना निर्देशांचे पालन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

आतापर्यंत जगभरात 4 कोटी 25 लाख 21 हजार 045 कोरोनाबाधित असून 11 लाख 49 हजार 735 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. रशियासह युरोपमध्ये कोरोनाबाधितांच्या संखेत वाढ होत आहे. त्यामुळे या देशांनी निर्बंध अधिक कडक केले आहेत. तर काही देश पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यापर्यंत पोहचले आहेत. कोरोना रोखण्यासाठी युरोपीय देशांनी आशियातील देशांचा आदर्श घ्यावा, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. या देशातील नागरिकांनी कोरोनाचे निर्देश काटेकोरपणे पाळल्याने या देशात कोरोना नियंत्रणात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या