कोरोना रुग्णाला तत्काळ बेड मिळणार, बाधित रुग्णांसाठी प्रत्येक वॉर्डात ‘बेड ऑन कॉल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेत झपाटय़ाने वाढणारी रुग्णसंख्या रोखण्यासाठी पालिकेने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. गेल्या वर्षी लस उपलब्ध नसल्यामुळे चाचण्या, क्वारंटाइन, उपचार, सर्वेक्षण, जनजागृती अशा पद्धतीने काम केले जात होते. तर आता लस उपलब्ध झाल्यामुळे लसीकरण, चाचण्या वाढवण्यात आल्या असून उपाययोजना केल्या जात आहेत.

यामध्ये ‘बेड ऑन कॉल’, सर्व 24 प्रभागांत ‘वॉर्ड वॉर रूम’च्या माध्यमातून समन्वय साधून कोरोनाविरोधात निर्णायक लढा सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर किशोरी पेडणेकर वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक सूचना देत आहेत. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पालिकेची यंत्रणा काम करीत आहे.

अॅडमिट होण्यासाठी ‘बेड ऑन कॉल’

ए विभाग 2270 0007, बी विभाग 2375 9023, सी विभाग 2219 7331, डी विभाग 23835004, ई विभाग 2379 7901, एफ/दक्षिण विभाग 2417 7507, एफ/उत्तर विभाग 24011380, जी/दक्षिण विभाग 2421 9515, जी/उत्तर विभाग 2421 0441 एच/पूर्व विभाग 2663 5400, एच/पश्चिम विभाग 2644 0121, के/पूर्व विभाग 2684 7000, के/पश्चिम विभाग 2620 8388, पी/दक्षिण विभाग 2878 0008, पी/उत्तर विभाग 2844 0001, आर/दक्षिण विभाग 2805 4788, आर/उत्तर विभाग 2894 7350, आर/मध्य विभाग 2894 7360 एल विभाग 7678061274 किंवा 7710870510, एम/पूर्व विभाग 2552 6301, एम/पश्चिम विभाग 2528 4000, एन विभाग 2101 0201, एस विभाग 2595 4000, टी विभाग 2569 4000.

एक लाखावर कर्मचारी अहोरात्र झटताहेत

पालिकेच्या सर्व विभागाचे सुमारे एक लाख 10 हजार कर्मचारी आहेत. हे सर्वच कर्मचारी सध्या कोरोना लढय़ात काम करीत आहेत. मुंबईकरांना नागरी सुविधा देण्याबरोबरच पावसाळापूर्व कामेही सुरू ठेवून कोरोना रोखण्यासाठी काम केले जात आहे. पालिकेच्या कर्मचाऱयांसोबतच ‘बेस्ट’चे हजारो कामगार, हजारो कंत्राटी कर्मचारीही विविध विभागांत काम करीत आहेत. यामध्ये खासगी संस्थांचेही सहकार्य मिळत आहे. यामध्ये गरजूंना नाश्ता, जेवणाचा पुरवठा केला जात आहे.

201 कर्मचाऱयांनी जीव गमावला

पालिकेच्या कोरोना लढय़ात आतापर्यंत 6 हजार 251 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये 5 हजार 346 कर्मचारी कोरोनावर मात करून पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत, मात्र पालिकेच्या कोरोना लढय़ात 201 कर्मचाऱयांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये घनकचरा विभागातील सर्वाधिक 46 आणि आरोग्य खात्यामधील 38 कर्मचाऱयांचा मृत्यू झाला.

असे होतेय काम

कोरोनाची लक्षणे आढळल्यास माहिती मिळण्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी ‘वॉर्ड वॉर रूम’ सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी डॉक्टरही उपलब्ध असून आवश्यक मार्गदर्शन करण्यात येत आहेत. रुग्णाला लक्षणे असल्यास काय करावे, कोणत्या ठिकाणी अॅडमिट व्हावे, कोविड सेंटर-रुग्णालयांची माहिती तज्ञ डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱयांकडून दिली जात आहे.

चाचणी कुठे करावी, अहवाल आल्यानंतर वॉर्ड रूमच्याच माध्यमातून रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली जात आहे. लक्षणे नसल्यास होम क्वारंटाइनचा सल्ला, कोणती काळजी घ्यावी याचेही मार्गदर्शन करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत पालिकेच्या केईएम, नायर, शीव, कूपरसारख्या मोठय़ा रुग्णालयांसह 212 आरोग्य केंद्रे, 187 दवाखाने आणि 5 स्पेशल हॉस्पिटल्स, 16 उपनगरीय रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी उपचार, क्वारंटाइनची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

सद्यस्थितीत दररोज 50 हजारांवर कोरोना चाचण्या आणि सुमारे 50 हजार जणांचे लसीकरण करण्यात येत आहे. रुग्ण वेगाने शोधून कार्यवाही करण्यासाठी चाचण्या आणखी वाढवण्यात येणार असून केंद्राकडून आवश्यक त्या प्रमाणात लसींचा पुरवठा झाल्यास दररोज एक लाख जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी पालिका, राज्य सरकार आणि खासगी मिळून 120 व्हॅक्सिनेशन सेंटर तैनात आहेत.

1916 डायल करा!

‘वॉर्ड वॉर रूम’बरोबरच पालिकेच्या ‘1916’ या क्रमांकाच्या माध्यमातूनही आवश्यक ती सर्व प्रकारची मदत, मार्गदर्शन करण्यात येत आहे. वॉर्ड वॉर रूमप्रमाणे या ठिकाणीही 24 तास मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य करण्यात येत आहे. विशेष म्हणचे दुर्घटनासंबंधित कामांसोबतच कोरोना लढय़ाचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुरू आहे.

मुंबईला मिळाले आणखी 1 लाख 35 हजार डोस

मुंबईला शुक्रवारी 99 हजार डोस मिळाल्यानंतर शनिवारी रात्रीपर्यंत आणखी 1 लाख 35 हजार डोस मिळाले आहेत. त्यामुळे लसीअभावी निर्माण झालेली कोंडी काही अंशी फुटायला मदत होणार असून लसीअभावी बंद करण्यात आलेली 71 खासगी लसीकरण केंद्रांपैकी 62 केंद्रे सोमवार, 12 एप्रिलपासून सुरू होणार आहेत.

ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे अशा व्यक्तींनाच सध्या या खासगी केंद्रांमध्ये जाऊन लस घेता येणार आहे. शुक्रवारी रात्री उशिरा 99 हजार लसी आणि शनिवार, 10 एप्रिल 2021 रोजी 1 लाख 34 हजार 970 अशा एकूण 2 लाख 33 हजार 970 लसींचे डोस दोन दिवसांत मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. त्यातून खासगी रुग्णालयांत लसीकरण केंद्रासाठी लस साठा वितरित करण्यात आला आहे. यामुळे उद्या सोमवार, 12 एप्रिल रोजी नियमित वेळेत 71 पैकी 62 खासगी लसीकरण केंद्रेदेखील सुरू होणार आहेत.