
कोरोनविरुद्धच्या लढ्यात तुम्ही करत असलेल्या कार्याची तुलना युद्धभूमीशी करावी लागेल. सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याला शब्द नाहीत, असे गौरवोद्गार पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी काढले आहेत. सर्वांनी सोशल डिसटन्स सांभाळून कार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
हम होंगे कामयाबचा दिला नारा
देशभरात कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. राज्यात संचारबंदी आणि कर्फ्यु लागू केल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. मात्र त्यानंतरही नागरिक भटकंती करीत आहेत. त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणी पोलीस कर्तव्य बजावत आहेत. याकालावधीत कर्तव्य पार पाडत असताना पुण्यातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यची देखील आयुक्त स्वत: आणि वरिष्ठ अधिकारी काळजी घेत आहेत. दरम्यान कोरोनाशी दोन हात करून 24 तास कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त डॉ. के. व्यकंटेशम यांनी प्रशंसा केली असून मनोबल वाढविले आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनीटायझर आणि सोशल डिस्टिंग पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तांनी सर्व पोलिसांसाठी एक पत्र लिहले आहे. त्यामध्ये त्यांनी पोलीस दलाचा खरा कणा असलेले तुम्ही सर्वजण ज्या धीराने सध्या कर्तव्य बजावत आहात, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शब्द कमी पडत आहेत. मागील सव्वा महिन्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस म्हणून आपण कर्तव्य पार पाडत आहात. लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना नाका-नाक्यावर चेकिंग आणि पोस्टवर, वस्त्या-वस्त्यांवर जाऊन उन्हा-तान्हात कर्तव्य भावनेने ज्या सेवेभावी वृत्तीने आपले कर्तव्य बजावत आहात, याची तुलना युद्धभूमीशी करावी लागेल, असे भावनिक शब्द त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी काढले आहेत. त्यासोबतच आयुक्तांनी “हम होंगे कामयाब एक दिन. मन मे है विश्वास, पुरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन” असा विश्वास व्यक्त केला आहे.



























































