
कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अर्थात त्याने कोणाकोणाला व कोणकोणत्या ठिकाणी भेट दिली याची माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याच्या घरापासून तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये प्रत्येक घरी जाऊन वैद्यकीय सहाय्यक, आशा व आरोग्य सेवकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आलेल्या 20 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेल्या 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात शुक्रवारी एकूण 3401 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व पोलीस तपासणी नाक्यांवर 405 व्यक्तींचा तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये एकाही व्यक्तीस कोरोना सदृष्य लक्षणे आढळलेली नाहीत.
अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहणार असून, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी करु नये असे आवाहन प्रशाननाने केले आहे. अत्यावश्यक सेवांची व जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना पास देण्याची प्रक्रिया संबंधित तालुका स्तरावर निवासी नायब तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, परिवहन निरीक्षक यांच्याकडून सुरू आहे. तसेच आंबा, काजू व फळे यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही परवाने देण्यात येत आहेत. भाजीपाला, अन्नधान्य, दूध, पशुखाद्य यांची वाहतूक सुरळीत सुरू आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासनास सहकार्य करावे, स्वच्छतेचे नियम पाळावे, कोरोना विरुद्धच्या या लढ्यामध्ये सर्वांनी आपापल्या घरात राहून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.





























































