कोरोनाच्या अफवेने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत

494

कोरोना कोंबड्या पासून होतो अशी अफवा पसरल्याने पोल्ट्री व्यवसाय पूर्णत: अडचणीत आला असताना आता खाद्य मिळेना म्हणून कोंबड्या उपाशी मरत आहेत. आपलं खाद्य म्हणून कोंबड्याच कोंबड्यांना मारून ते मांस खाऊन जगण्याचा जीवघेणा प्रयत्न करताना दिसून येत आहे. हे चित्र सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्‍यातील काही पोल्ट्रीमधून समोर आले आहे.

कोरोना कोंबड्यांमुळे होतो अशी सुरुवातीच्या काळात अफवा पसरली आणि कोंबडी व्यवसाय पूर्णतः संकटात आला. लोकांनी चिकनकडे पाठ फिरवली, चिकनची दुकाने बंद झाली. जिल्ह्यात आणि राज्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरलेले असताना आता लॉकडाऊनमुळे पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे धोक्यात आला आहे. काही पोल्ट्रीधारकांनी मोठ्या कष्टपूर्वक काही कोंबड्या जगवण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने कोंबड्यांचे खाद्य मिळणं कठीण झाले आहे.

कोंबड्यांना नेमकं काय खायला द्यायचं हा प्रश्न सध्या सांगली जिल्ह्यातील काही पोल्ट्रीधारकांसमोर उभा आहे त्यामुळे अनेक कोंबड्या अन्नावाचून तडफडून मारताना दिसत आहेत अशा मेलेल्या कोंबड्या जमिनीत गाडण्याशिवाय या पोल्ट्री धारकांसमोर पर्याय नाही. असे असं विदारक चित्र एकीकडे असतानाही आपली भूक भागवण्यासाठी काही कोंबड्या कोंबड्यांनाच खाद्यासाठी आपलं लक्ष्य करीत आहेत. एकमेकांना मारून त्यांचे मांस खाऊन आपली भूक भागवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र तासगाव तालुक्यातील काही पोल्ट्रीमधून समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या