कोरोना उतरणीला! ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना आता वेगाने उतरणीला लागला असून रुग्णसंख्या चांगलीच आटोक्यात आली आहे. यामुळे मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही झपाटय़ाने घटत आहे. नोव्हेंबरमध्ये पहिल्याच आठवडय़ात सील इमारती 1159 तर झोपडपट्टय़ा-चाळीमधील कंटेन्मेंट झोनची संख्या 82 इतकी कमी झाली आहे. म्हणजेच एकाच आठवडय़ात 1241 प्रतिबंधित क्षेत्र घटली आहेत. पालिकेच्या माध्यमातून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळेच हे यश आले आहे.

मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोना ऑगस्टअखेरीस पुन्हा झपाटय़ाने वाढू लागल्याने पालिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. यात घरोघरी सर्वेक्षण, तपासणी, स्क्रिनिंग आणि जनजागृती करण्यात आली. याशिवाय नोव्हेंबरच्या सुरुवातीला सुरू करण्यात आलेल्या 244 मोफत कोरोना चाचणी सेंटरमुळे मोठय़ा प्रमाणात चाचण्या करून कार्यवाही करण्यात आली. यात पहिल्या सहा दिवसांत तब्बल 9 हजार चाचण्या करण्यात आल्या. 1916 या क्रमांकावर आणि पालिकेच्या वेबसाईटवर संपर्क केल्यास अगदी घराजवळच्या सेंटरमध्ये मुंबईकरांना कोरोना चाचणी करता येत आहे. मास्कचा नियमित उपयोग, हातांची वारंवार स्वच्छता राखणे व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे, यासाठी जनजागृती करून भर देण्यात आला. मुंबई महानगरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. या सर्व अथक प्रयत्नांचे प्रतिबिंब आता आकडेवारीतही उमटताना दिसत आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कोरोनाविरोधातील शेवटच्या आणि आक्रमक लढय़ाला आता चांगलेच यश येत आहे. यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या दररोज शेकडोने कमी होत आहेत.

रुग्ण दुपटीचा कालावधी सवादोनशेवर

रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी 8 नोव्हेंबरपर्यंत 222 दिवसांपार गेला आहे. यात 4 विभागात 300पेक्षा अधिक तर 11 विभागांत 200पेक्षा अधिक दिवसांचा रुग्ण दुप्पटीचा कालावधी झाला आहे. यात ‘जी-उत्तर’ 351 दिवस, ‘एफ-दक्षिण’ 316 दिवस, ‘ए’ विभाग 308 दिवस आणि ‘सी’ विभाग 306 दिवस यांचा समावेश आहे.

रुग्णवाढीचा सरासरी दरदेखील आता 0.33 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असताना रुग्णसंख्या वाढीतदेखील लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढीचा साप्ताहिक दर जितका कमी तेवढे संसर्गावर नियंत्रण अधिक मानले जाते. हे पाहता 29 ऑक्टोबर 2020 रोजी असलेला 0.44 टक्के इतका रुग्णवाढीचा सरासरी दर आता 0.33 टक्के इतका झाला आहे.