मित्रा जिंकलंस! खुरपणीची कामे करून दिव्यांगाने केली उपासमारीवर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोना या संकटाने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. पण अशा संकटामुळे येणाऱ्या उपासमारीवर बीड जिल्ह्यातील दिव्यांग शेतकऱ्याने मात केली आहे. या तरुणाने दुसऱ्यांपुढे हात पसरण्याऐवजी कष्ट करून कमाई करायचं ठरवलं होतं. त्याने लॉकडाऊन दरम्यान रोजंदारीवर दुसऱ्यांच्या शेतात जाऊन खुरपणी सुरू केली आणि त्यातून तो थोडीथोडकी का होईना पण कमाई कमवायला लागला.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात वडगाव येथे राहणाऱ्या या दिव्यांग शेतकऱ्याचं नाव अशोक मधुकर गीते (32) असं आहे. आई-वडील एक भाऊ एक बहीण असा असा परिवार असलेल्या अशोक यांनी कोरोना काळातील संकटावर मात करण्यासाठी घरी बसून न राहता शेतीतली सर्व कामे रोजंदारीवर करण्यास सुरुवात केली आहे.

अशोक पीक कापणीपासून खुरपणीपर्यंतची कामे करून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत. या कामासाठी त्यांना दोनशे रुपये मिळत आहेत. अशोक यांचे वडील मधुकर गीते व भाऊ पप्पू गीते यांची देखील परिस्थिती हलाखीची असून हे देखील ऊसतोड कामगार आहेत. तरुणांनी आदर्श घ्यावा असे या दिव्यांगाचे काम असून अशोक यांच्या कामाने वडगाव ढोक या गावात त्यांचे कौतुक होत आहे.