खूशखबर! कोरोनामुक्त @ 51 लाख; रिकव्हरी रेट 83.01 टक्क्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीमुळे चिंतेत असलेल्या नागरिकांना खूशखबर आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून हिंदुस्थानभोवती घट्ट अवळलेला कोरोना महामारीचा फास काहीसा सैल होऊ लागला आहे. देशातील कोरोनाबधितांची संख्या 61 लाखांवर गेली असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा तब्बल 51 लाखांवर गेला आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट 83.01 टक्के एवढा झाला आहे. ही बाब आरोग्य यंत्रणेसह सर्व सामान्यांना दिलासा देणारी आहे.

कोरोना महामारीला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह सर्वच स्तरातून सुरू असलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 61लाख कोरोना बधितांपैकी 51 लाख 1 हजार 397 नागरिक कोरोनामुक्त झाले असून केवळ 9 लाख 47 हजार 576 ऑक्टिव्ह केसेस आहेत. सध्या कोरोना बधितांच्या तुलनेत कोरोना मुक्त होणाऱ्यांचा आकडा वाढत आहे.

कोरोनामुक्त होणाऱ्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात
सध्या कोरोनामुक्त होणाऱ्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. गेल्या 24 तासातील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 20 हजार नागरिक कोरोनामुक्त झाले असून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी 7 हजारहून अधिक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान देशातील एकूण कोरोनामुक्तांपैकी 74 टक्के रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्ली, ओडिसा, केरळ या राज्यातील आहेत.

व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण
उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची बाधा झाली आहे. उपराष्ट्रपती यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. नायडू यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. व्यंकय्या नायडू यांची पत्नी उषा यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

उदय सामंत यांना कोरोना
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. सामंत यांनी याची माहिती समाज माध्यमाद्वारे दिली आहे.