
मुंबईत दिवाळीत फक्त चारशे पॉझिटिक्ह रुग्णांपर्यंत नोंद झालेली दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसांत एक हजारांवर नोंदवली जात असली तरी मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नसून चाचण्या वाढल्यामुळेच रुग्णसंख्या जास्त नोंदवली जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. दिवाळीदिवशी केवळ चार हजार चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र आता चाचण्यांची संख्या 17 हजारांवर गेल्याने जास्त रुग्ण आढळल्याचेही काकाणी म्हणाले. ही संख्या लवकरच नियंत्रणात येईल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे मुंबईत कोरोना चांगलाच नियंत्रणात आला आहे. 16 नोव्हेंबर रोजी तर दैनंदिन रुग्णसंख्या केवळ 409 इतकी नोंदवली गेली. मात्र गेल्या सलग चार दिवस रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले. ही रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनाची दुसरी लाट येणार का अशी भिती मुंबईकरांमधून व्यक्त केली जात आहे. मात्र ही कोरोनाची दुसरी लाट नसून चाचण्या वाढवल्याने रुग्ण जास्त सापडत असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
दिवाळी दिवशी 4 हजार चाचण्या करण्यात आल्या, दुसऱया दिवशी 5 हजार त्यानंतर 11 हजार आणि 16 हजार आणि आज 17 हजार 250 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. वाढलेल्या चाचण्यांच्या प्रमाणात जास्त रुग्ण आढळत असल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असणारे सोशल डिस्टंसिंग पाळावे, मास्कचा वापर करावा आणि वारंवार साबणाने हात धुवत रहावे असे आवाहनही त्यांनी केले.
पॉझिटिक्ह रेटमध्ये कमालीची घट
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर झपाटय़ाने रुग्णसंख्या वाढत गेली. यावेळी होणाऱ्या चाचण्यांमध्ये पॉझिटिक्ह रुग्ण येण्याचे प्रमाण तब्बल 34 ते 35 टक्क्यांपर्यंत होते. मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. सद्यस्थितीत चाचण्यांमध्ये रुग्ण पॉझिटिक्ह आढळण्याचे प्रमाण केवळ 6 टक्के असल्याची माहितीही अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी दिली. दरम्यान, मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर गेले असून आतापर्यंत 2 लाख 50 हजार 456 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आतापर्यंत 17 लाख 39 हजार चाचण्या
मुंबईत कोरोना चाचण्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. यामध्ये 20 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 17 लाख 39 हजार 865 चाचण्या झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. सुरुवातीच्या काळात मुंबईत चाचण्यांचे दररोजचे सरासरी प्रमाण पाच हजार होते. मात्र सद्यस्थितीत दररोज सरासरी होणाऱया चाचण्यांचे प्रमाण 17 ते 18 हजार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.





























































