लसीकरणाने रोखता येणार कोरोनाची तिसरी लाट ; संसर्गजन्य आजारतज्ञांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आपण यशस्वी ठरलो तर कोरोनाची तिसरी लाट निश्चितच रोखता येईल असा विश्वास या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिहेरी फायदा आहे. लसीकरणामुळे आपण कोविडमुळे होणारे मृत्यू 100 टक्के टाळू शकतो. लस घेतलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण जरी झाली तरी त्यांची प्रकृती चिंताजनक होण्याचे प्रमाण अत्यल्प असेल. त्याचप्रमाणे त्यांच्यापासून इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण जवळजवळ 60 ते 80 टक्क्यांनी कमी होईल असे ऑर्गनाइज्ड मेडिसिन अॅपॅडेमिक गिल्डचे (ओमाग) सरचिटणीस व संसर्गजन्य आजार प्रतिबंधक क्षेत्रातील तज्ञ डॉ. ईश्वर गिलाडा यांनी सांगितले.

एक डोस घेतल्यानंतरही कोरोना का होतोय?

लसीकरणाने आपण भविष्यातील कोरोनाचा धोका टाळू शकतो हे जरी खरे असले तरी लसीचे शास्त्र प्रत्येकाने जाणून घेण्याची गरज आहे असे डॉ. गिलाडा यांनी सांगितले. कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी कोरोना विषाणूला प्रतिकार करणारी शक्ती शरीरात निर्माण होते. एक डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे त्यामागे हे कारण असल्याचे डॉ. गिलाडा यांनी सांगितले.